Join us

जुई गडकरीनंतर आता आणखी काही कलाकार सरसावले इर्शाळवाडीच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 1:38 PM

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे मोठी दुर्घटना घडली. बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळला.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे मोठी दुर्घटना घडली. बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळला. यातून अनेक जणांना वाचवण्यात आले तर अनेकजण दगावले. इर्शाळवाडीच्या मदतीसाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला असून येत्या महिन्याभरात सिडको मार्फत गावाच्या पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच काही खाजगी संस्थांनीही मदत पुरवली आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळली ही बातमी कळताच ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरी हिने मोठी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर या लोकांसाठी तिने अन्न, चादरी, चपला, औषधं अशा प्राथमिक स्वरूपाची मदत पाठवली. आपल्या चाहत्यांनाही तिने मदतीचे आवाहन केले.

जुई गडकरी पाठोपाठ आता मराठी सिनेइंडस्ट्रीतून आणखी काही कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.  अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हॅक्यूम क्लिनर या नाटकाच्या प्रयोगातून मिळणारी रक्कम इर्शाळवाडीच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्य संकुल येथे या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे. नाट्य निर्माते दिलीप जाधव हे प्रयोगातून मिळालेली रक्कम इर्शाळवाडीला देणार आहेत. 

याचसोबत भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची भूमिका असलेला करून गेलो गाव या नाटकाच्या प्रयोगातून मिळालेली रक्कम इर्शाळवाडीच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी करून गेलो गाव या नाटकाचे तीन प्रयोग आयोजित केले आहेत. त्यातील एका प्रयोगातून मिळालेली रक्कम मदत म्हणून देण्यात येईल असे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले आहे. हा मदतीचा ओघ पाहून आणखी काही नाट्य तसेच सिनेमा निर्मात्यांनी दुर्घटनाग्रस्तांना मदत पाठवण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :जुई गडकरीअशोक सराफनिवेदिता सराफ