मुंबईची पीओकेशी तुलना करणारी अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद पेटला असताना मुंबई पालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईवर देशभर पडसाद उमटले असताना आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या कार्यालयावर मुंबई पालिकेचा डोळा आहे. बीएमसीने अनधिकृत बांधकामाप्रकरणी मनीष मल्होत्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कंगनाचे कार्यालय आहे, त्याच पाली हिल भागात मनीष मल्होत्रा याचेही कार्यालय आहे. बीएमसीने मनीषला सात दिवसांची मुदत दिली असून सात दिवसांच्या आत नोटीसचे उत्तर देण्याचे बजावले आहे. मनीष मल्होत्राने अलीकडे आपल्या ऑफिसच्या फर्स्ट फ्लोरवर काही बदल केले होते. यापार्श्वभूमीवर बीएमसीने एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकाम का पाडले जाऊ नये, याचे स्पष्टीकरण याद्वारे मागवण्यात आले आहे. यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिसमध्ये लिहिले आहे.व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले नसल्याचे कळते.मनीष मल्होत्रा हे बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. बॉलिवूड व हॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाईनर व स्टाइलिस्ट अशी त्याची ओळख आहे.
कंगनाने शेअर केला तोडलेल्या ऑफिसचा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले- 'तुम्ही काळजी करू नका...'
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनाला भारी पडणार; विक्रोळीत तक्रार दाखल
कंगनाचे कार्यालयावर हातोडा
बुधवारी बीएमसीने कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर हातोडा चालवला होता. ऑफिस तोडल्यावर कंगना चांगलीच संतापली असून ती सतत राज्य सरकारवर सोशल मीडियातून टीका करत आहे. कंगनाने याचवर्षी तिच्या प्रॉडक्शन हाऊससाठी ऑफिस सुरू केले होते. या कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाईनंतर संतापलेल्या कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता़ ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,’ अशी टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने केली होती. यावेळी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता.
कंगनाच्या खारमधील फ्लॅटवरही बीएमसीच्या रडारवर
कंगनच्या पाली हिल भागातील कार्यालयावर हातोडा मारल्यानंतर आता मुंबई महापालिकेचे पुढील लक्ष्य कंगनाचे खारमधील राहते घर आहे. न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी बीएमसीने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती.