बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. बॉलिवूडमध्ये १०० कोटी, २०० कोटी क्लब सुरु करण्याचं श्रेय आमिर खानला जातं. '३ इडियट्स', 'गजनी', 'पीके' अशा अनेक सिनेमांमधून आमिरने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली. आमिर खानचा शेवटचा सिनेमा 'लाल सिंग चढ्ढा' बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. सिनेमा फ्लॉप होऊनही आमिरने एक मोठी गोष्ट केली होती सिनेमातील स्टारकास्टला खूश केलं होतं. आमिरने असं काय केलं होतं, याचा खुलासा 'लाल सिंग चढ्ढा'मधील आमिरची सहकलाकार मोना सिंगने केलाय.
'लाल सिंग चढ्ढा' फ्लॉप झाला अन् आमिरने...
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मोना सिंंगने खुलासा केला की, "लाल सिंग चढ्ढा झाल्यावर खूप दुःख झालं. आम्ही इतके दिवस शूट केलं होतं. आमच्यात खूप चांगलं बॉंडींग झालं होतं. आम्ही सर्व दुःखी झालो होतो. पण जेव्हा हा सिनेमा ओटीटीवर आला तेव्हा आम्हाला वेगळ्याच प्रतिक्रिया मिळाल्या. अचानक या सिनेमाबद्दल लोक चर्चा करु लागले. लोक सिनेमाचं कौतुक करु लागले."
लाल सिंंग चढ्ढा फ्लॉप झाल्यावर आमिरने दिली पार्टी
मोना सिंगने पुढे खुलासा केला की, "आमिर असा एकमेव अभिनेता आहे ज्याने सिनेमा फ्लॉप झाल्यावर आम्हाला पार्टी दिली होती. सर्वांनी केलेल्या मेहनतीच्या सन्मानार्थ आमिरने पार्टी दिली होती. सिनेमा अयशस्वी झाला पण आपल्याला सेलिब्रेशन करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असं आमिर म्हणाला होता. आमिरने सर्वांना बोलावलं होतं आणि सिनेमा फ्लॉप व्हायची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. त्यामुळे मी आमिर खान यांचा आदर करते." 'लाल सिंग चढ्ढा' २०२२ साली रिलीज झालेला. सिनेमात आमिर खान, करीना कपूर खान, मोना सिंग या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.