मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे एकच सुपरहिट सिनेमात देत रातोरात स्टार झाले.एकाच सिनेमाने कलाकारांचं नशीबच पालटलं. पण नंतर हेच कलाकार अचानक गायबही झाले. रातोरात स्टार झालेल्या एका अभिनेत्रीसोबत असंच काहीसं घडलं. एकच सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर ती रातोरात स्टार झाली होती. मात्र यानंतर झालेल्या भयानक अपघातात तिची स्मरणशक्तीच गेली. आपलाच सिनेमा पाहतानाही तिला स्वत:ची ओळख पटली नाही. कोण आहे ती अभिनेत्री? ही कहाणी आहे 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवालची (Anu Aggarwal) . 1990 साली आलेला 'आशिकी' हा सिनेमात आज ३४ वर्षांनंतरही लोकप्रिय आहे. सिनेमातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. या सिनेमामुळे अभिनेता राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल रातोरात स्टार झाले. अनु अग्रवाल तर तेव्हा नॅशनसल क्रश बनली. सिनेमा हिट झाल्यानंतर ९ वर्षांनी 1999 मध्ये अनुचा भीषण अपघात झाला. ती 29 दिवस कोमात होती. शुद्धीत आली तेव्हा तिने स्मरणशक्तीच गमावली होती. ती स्वत:लाही ओळखत नव्हती.
नुकत्याच एका मुलाखतीत अनु म्हणाली,"मी आशिकी सिनेमा शेवटचा पाहिला जेव्हा माझी स्मरणशक्ती गेली होती. आईने मला सिनेमा लावून दिला होता. पण ते पाहताना मी स्वत:लाही स्क्रीनवर ओळखू शकले नाही. मला सिनेमातील भावना समजत होत्या. आईने मला 'ही तूच आहेस' असंही सांगितलं पण मला फारसं काहीच वाटलं नाही. कारण मी स्वत:लाच ओळखत नव्हते."
ती पुढे म्हणाली,"त्यावेळी आशिकी 2 ही रिलीज झाला होता. आईने मला तोही दाखवला. तेव्हा तर मी चक्क 2 हे काय आहे असं विचारलं होतं. म्हणजे मला 1 2 3 याचाही अर्थ कळत नव्हता अशी माझी परिस्थिती होती. मला ओळख पटत नसली तरी मला सिनेमातील इमोशन्स समजत होते."
अनु अग्रवाल पुन्हा मनोरंजनविश्वात कमबॅक करत आहे. सध्या ती काही स्क्रीप्ट्स वाचत आहे. माझी पहिली रोजीरोटी ही अभिनय क्षेत्रातूनच आली होती. आता मला पुन्हा अभिनयात यायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे असं अनु म्हणाली.