Netflix नंतर आता Disney Plus नेही मोठा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी Netflix ने पासवर्ड शेअरिंग फीचर बंद केले होते. आता तोच मार्ग Disney Plus नेही अवलंबला आहे. Disney Plus ने पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला पासवर्ड शेअर करायचा असेल तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील.
डिज्नीचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर ह्यूज जॉन्सटन यांनी याबाबत माहिती दिली. एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्यांच्या अकाउंटने लॉग-इन केलं, तर तिथे नवीन साईन-अप विंडो किंवा सबस्क्रिप्शन अपडेट विंडो ओपन होईल. हे निर्बंध मार्च 2024 पासून लागू होऊ शकतात. पण, हे कशा प्रकारे लागू होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, Disney Plus या पॉलिसीची टेस्टिंग करत आहे.
Disney Plusची योजना पासवर्ड शेअरिंग थांबवण्याची आहे. यासाठी नवीन फीचर्स सादर करण्यात येत आहेत. पासवर्ड शेअरिंग फीचरमुळे त्रास होत असल्याचे कंपनीचे मत आहे. भारतीय सबस्क्रिप्शन न घेता पासवर्ड शेअर करतात. पॉलिसी लागू झाल्यानंतर Disney चा पासवर्ड आपण मित्र-मैत्रीणींना शेअर करु शकणार नाही. पण एकाच घरातील लोकांमध्ये Disney पासवर्ड आरामात शेअर करता येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या OTT प्लॅटफॉर्मची मोठी चलती आहे. आजची युवा पिढी OTT Platforms ना खूप जास्त महत्त्व देते. हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होऊ लागले आहेत. भारतात OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाले तर Disney, Netflix, Amazon आणि JioCinema खूप लोकप्रिय आहेत. विश्लेषकांच्या मते, Disney+ Hotstar चे भारतात 50 मिलियनहून अधिक युजर्स आहेत.