लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. साहजिकच आता प्रतिक्षा आहे ती शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील चौथ्या सिनेमाची. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतर दिग्पाल शिवरायांवरचा कोणता नवा सिनेमा घेऊन येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तर त्याचीही घोषणा झाली आहे. होय, ‘पावनखिंड’नंतर दिग्पाल ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा घेऊन येणार आहे.
दिग्पाल यांनी गतवर्षी 24 डिसेंबरलाच या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर केली होती. ‘शेर शिवराज’चं पोस्टर शेअर करत, ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला... अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह... शेर शिवराज...,’ अशा आशयाची पोस्ट दिग्पाल यांनी लिहिली होती. या पोस्टनुसार हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांची आठ सिनेमांची मालिका आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटातही अभिनेता चिन्मय मांडलेकर हाच शिवरायांची भूमिका साकारताना दिसणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानच्या वधाचा प्रसंग शिवप्रेमींना अभिमान वाटावा असा आहे. हाच प्रसंग या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘पावनखिंड’ची घोडदौडअलीकडे शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागला आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगहात दाखल झाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला 1910 शो मिळाले. याचा परिणाम म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी सिनेमाने 1.15 कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी या चित्रपटाने 2.05 कोटींची कमाई केली आणि रविवारी तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 3 कोटींवर पोहोचला. चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्ये एकूण 6 कोटींचा बिझनेस केला आहे. विशेष म्हणजे, नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.