Join us

प्राजक्ता गायकवाडनंतर आता वीणा जगतापनं सोडली 'आई माझी काळूबाई' मालिका, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:42 PM

वीणा जगतापने 'आई माझी काळूबाई' मालिका सोडली आहे आणि अभिनेत्री रश्मी अनपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई माझी काळूबाईने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेच्या सुरूवातीला आर्याच्या भूमिकेत प्राजक्ता गायकवाड पहायला मिळाली होती. त्यानंतर काही दिवसात तिने मालिकेला राम राम केला होता. त्यानंतर तिचे प्रोडक्शन्ससोबत असलेले वाद समोर आले होते. या मालिकेत तिच्या जागी वीणा जगतापची वर्णी लागली होती. आता समजते आहे की तिनेदेखील मालिका सोडली आहे. तिच्याजागी आता अभिनेत्री रश्मी अनपट दिसणार आहे. वीणाने मालिका का सोडली याचे कारण नुकतेच समोर आले आहे.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार वीणा जगतापने 'आई माझी काळूबाई' मालिका सोडली आहे आणि अभिनेत्री रश्मी अनपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वीणाने तिच्या तब्येतीमुळे मालिका सोडायचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला बरे वाटत नव्हते आणि सलग असणाऱ्या शूटिंग शेड्युलमुळे तिची तब्येत बिघडते आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री रश्मी अनपट लवकरच वीणा जगतापच्या जागी दिसणार आहे. ती आर्याची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.रश्मी अनपटच्या कामाबद्दल सांगायचे तर ती पुढचं पाऊल, फ्रेशर्स आणि बऱ्याच मालिकेत झळकली आहे.  

'आई माझी काळुबाई' या मालिकेत सध्या विराटच्या आसुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले  पुरोहित  कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला  आहे. या महतत्त्वाच्या  टप्प्यावर  रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल.

लोकप्रिय युवा अभिनेता  विवेक सांगळे याच्याबरोबर अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे  या दमदार अभिनयसंपन्न कलाकारांबरोबर रश्मीचे 'आर्या' साकारणे हे या मालिकेचे वेगळेपण ठरेल. मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता, २९ मार्च ते ३ एप्रिल  हा सप्ताह एका तासाच्या विशेष भागांचा असणार आहे.

टॅग्स :वीणा जगतापप्राजक्ता गायकवाड