Join us

रिहानानंतर या सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा, एक तर जॅकलिन फर्नांडिसची जुडवा म्हणून आहे प्रचलित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:56 PM

शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीदेखील पाठिंबा देत आहे. या सेलिब्रेटींमध्ये आता हॉलिवूडच्या कलाकारांचादेखील समावेश झाला आहे.

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या आंदोलनाची चर्चा जगभरात ऐकायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीदेखील पाठिंबा देत आहे. या सेलिब्रेटींमध्ये आता हॉलिवूडच्या कलाकारांचादेखील समावेश झाला आहे. मंगळवारी प्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. त्यानंतर जगभरात या आंदोलनाची चर्चा जोरात व्हायला लागली. रिहानानंतर हॉलिवूडच्या कित्येक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची जुडवा म्हणून प्रचलित असलेली प्रसिद्ध अमांडा सेर्नीने शेतकरी आंदोलनावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. अमांडाने तिच्या इंस्टाग्रामवर तीन वृद्ध महिलांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले की, संपूर्ण जग पाहत आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी तुम्हाला भारतीय, पंजाबी किंवा दक्षिण आशियायी असण्याची गरज नाही. तुमच्याकडे फक्त माणूसकीची भावना असली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रेसचा अधिकार, कामागारांसाठी समानता आणि सन्मान यासारख्या समान हक्कांची मागणी करा.

प्रसिद्ध युट्यूबर लिली सिंगनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिने रिहानाचे ट्विट रिट्विट करत तिचे आभार मानले आहेत. लिली सिंगने ट्विटमध्ये लिहिले की, धन्यवाद रिहाना. हा मानवतेचा मुद्दा आहे.

रिहानाच्या ट्विटनंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केले आहे. ग्रेटाने ट्विटरवर लिहिले की, 'आम्ही सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात एकजुटीने उभे आहोत'.

याशिवाय आणखी काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :शेतकरी संपजॅकलिन फर्नांडिस