बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या 'सिंघम अगेन'मुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम या फ्रॅन्चायजीचा हा पुढचा भाग प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अजय देवगणच्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. 'सिंघम अगेन' नंतर आता अजय देवगणच्या गाजलेल्या 'दृश्यम', 'शैतान' आणि 'गोलमाल' या सिनेमांचेही सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अजय देवगणने नुकतीच 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलबाबत भाष्य केलं. 'शैतान २' आणि 'दृश्यम ३' वर काम सुरू असल्याचं अजय देवगणने सांगितलं. याबरोबरच आणखी ४ सिनेमांचे सीक्वल येणार असल्याचंही तो म्हणाला. "सध्या 'शैतान २'च्या कथेवर काम सुरू आहे. तर माझी एक टीम दृश्यमच्या पुढच्या भागावरही काम करत आहे", असं त्याने सांगितलं. 'दृश्यम ३' आणि 'शैतान २' बरोबरच अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे', 'सन ऑफ सरदार', 'धमाल' आणि 'गोलमाल' या सिनेमांचेही सीक्वल येणार आहेत.
२०१५ साली अजय देवगणचा 'दृश्यम' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०२२ मध्ये या सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला. आता 'दृश्यम ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहतेही खूश आहेत. तर २०२४ मध्ये आलेल्या अजय देवगण आणि आर माधवनच्या शैतानलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेतही प्रेक्षक होते.
दरम्यान, 'सिंघम अगेन' सिनेमात रोहित शेट्टीने अख्ख बॉलिवूड उतरवलं आहे. या सिनेमात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, दीपिका पादुकोण अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १८० कोटींचा गल्ला जमवला आहे.