Join us

'देशात अशाचप्रकारे अजान लावत राहिले तर...; अनुराध पौडवाल यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 2:20 PM

Anuradha Paudwal: काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध गायक सोनू निगम याने लाउडस्पीकरवर लावण्यात येणाऱ्या अजानविषयी भाष्य केलं होतं. त्याच्यानंतर आता अनुराधा पौडवाल यांनी त्यांचं मत मांडलं आहे

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध गायक सोनू निगम याने लाउडस्पीकरवर लावण्यात येणाऱ्या अजानविषयी  (Sonu Nigam on Azaan) भाष्य केलं होतं. त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला होता. परिणामी, त्याला जाहीरपणे माफीही मागावी लागली होती. त्याच्यानंतर आता प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी अजानसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी अजानविषयी भाष्य केलं असून त्या चर्चेत आल्या आहेत.

"भारतात ज्याप्रमाणे लाउडस्पीकरवर अजान लावलं जातं तसं जगातील कुठल्याही देशात केलं जात नाही. जर मुस्लीम राष्ट्रांमध्ये ही पद्धत नाही तर मग भारतात हे सगळं का होत?" असा सवाल त्यांनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

"मी जगातील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे. परंतु, आपल्या देशात जे होतं ते इतर देशांमध्ये नाही पाहिलं. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु, आपल्यावर जबरदस्तीने हे थोपवलं जात आहे. मस्जिदींवर लाऊडस्पीकर लावून त्यावर अजान लावली जाते. त्यामुळे इतरांनाही वाटतं की, मग आम्ही आमचा स्पीकर का लावू नये? मी तर मध्य पूर्व देशांमध्येही प्रवास केला आहे. परंतु, तेथे लाउडस्पीकरवर अजान लावणं बॅन आहे", असं अनुराधा पौडवाल म्हणाल्या.पुढे त्या म्हणतात, "जर मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये लाउडस्पीकरवर अजान लावलं जात नाही. तर मग भारतातच असं का केलं जातं? जर देशात अशाचप्रकारे अजान लावत राहिले तर हनुमान चालीसा देखील याच पद्धतीने लावली जाईल. ज्यामुळे वादविवाद वाढू शकतो.हे खरंच फार दु:खद आहे."

या मुलाखतीमध्ये अनुराधा पौडवाल यांनी नवरात्र आणि रामनवमी यांविषयीदेखील भाष्य केलं. आजच्या पिढीला आपली संस्कृती समजावी, तिची ओळख होणं गरजेचं आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, २०१७ मध्ये सोनू निगमने ट्विटरवर अजानसंदर्भात असंख्य पोस्ट शेअर केल्या होता. "जे लोक धर्माचं पालन करत नाहीत,त्यांना सकाळी उठवण्यासाठी मंदिर आणि गुरुद्वारामधील विजेचा वापर केला जातो असं मला वाटत नाही. तर मग असं का? गुंडागर्दी आहे सगळी. तसंही मोहम्मद यांनी इस्लाम धर्म अस्तित्वात आणला त्यावेळी त्यांच्याकडे वीज नव्हती. तर मग एडिसननंतर हा कोलाहल का? देवा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी ठेव. मी मुस्लीम नाही.आणि, तरीदेखील मला रोज अजानमुळे सकाळी लवकर उठावं लागतं. भारतात ही धर्म जबरदस्तीने थोपवण्याची प्रथा कधी बंद होईल?" असा सवाल सोनू निगमने उपस्थित केला होता. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला होता. सोनूला अनेकांनी ट्रोल करत त्याला बॅन करण्याचीही मागणी केली होती.

टॅग्स :अनुराधा पौडवालसेलिब्रिटीबॉलिवूड