Salman Khan Security : अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली असून राजकीय क्षेत्रासह संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आसे आहेत. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाहीये.
अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेवर आता मुंबई पोलिसांच्या कडक नजर आहेत. सलमान खानसाठी आता वाय-प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे आणि पोलिसांचे एस्कॉर्ट वाहन आता सलमान खानच्या वाहनासोबत असणार आहेत. यासह त्याच्यासोबत सर्व शस्त्रे वापरण्यासाठी प्रशिक्षित हवालदार असणार आहे. याशिवाय सलमान खानच्या घराबाहेर वैयक्तिक सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षा चर्चेत आली आहे. सलमानसोबत बाबा सिद्दीकींची असलेली घनिष्ठ मैत्री त्यांच्या हत्येसाठी कारणीभूत असल्याचेही म्हटलं जात आहे. दुसरीकडे सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सलमान खान शूटिंगसाठी ज्या भागात जाईल तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्याच्या ठावठिकाण्याबाबत सतर्क केले जाईल आणि पोलिसांचे एक पथक शूटिंगच्या ठिकाणावर लक्ष ठेवणार आहे.
पनवेल फार्महाऊस देखरेखीखाली
पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, फार्महाऊसच्या आजूबाजूला फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करता यावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. फार्महाऊसकडे जाणारा एकच रस्ता आहे आणि तो एका गावातून जातो.जूनमध्ये मुंबई पोलिसांनी फार्महाऊसजवळ सलमान खानच्या हत्येचा प्लान हाणून पाडला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीने खानला त्याच्या फार्महाऊसजवळ कार थांबवून एके-४७ रायफलने गोळ्या घालून ठार मारण्याची योजना आखली होती. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही घटना घडली.
बिग बॉसच्या सेटवर सुरक्षा वाढवली?
रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉसचा १८वा सीझन सलमान खान होस्ट करत आहे. त्यामुळे जेव्हा सलमान खान एपिसोडसाठी शूट करेल, तेव्हा त्याची टीम हजर असणार असून त्याच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. सलमानला नुकत्याच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर त्याच्यासोबत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत, सलमानच्या शूटिंगच्या वेळापत्रकातही कोणताही बदल झालेला नाही. सलमान खानने ११ ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या शेवटच्या वीकेंड एपिसोडचे शूटिंग केल्याच्या एका दिवसानंतर बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आली.