बॉलिवूड अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. फराह खान आणि तिचा भाऊ साजिद खान यांचं मातृछत्र हरपलं. फराह खान या दुःखद घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच व्यक्त झालीय. फराहने आईसोबतचे बालपणीचे खास फोटो शेअर करत सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिलीय. फराहने पोस्टमधून सांगितलंय की, दुःख सहन करुनही ती कामावर परतली आहे.
फराह खान आईविषयी काय म्हणाली
फराह खानने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो पोस्ट लिहून लिहिलंय की, "माझी आई एक वेगळीच व्यक्ती होती. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष सहन करुनही तिच्या मनात कोणाविषयी काही कटूता नव्हती. आमच्या आईकडे बघून, तिच्याशी बोलून आम्हाला सेंस ऑफ ह्यूमर कसा मिळालाय याचा लोकांना अनुभव मिळायचा. साजिद, मी आणि आई आम्ही एकत्र असू तेव्हा खूप मजा करायचो. कोणतीही परतफेडीची अपेक्षा न करता आई आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना किंवा इतरांना पैशांची मदत करायची."
मला तिची आठवण काढायची नाही कारण...
फराह पुढे लिहिते, "नानावटी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि नर्सचे प्रयत्नांबद्दल आभार. चंदीगढमधील डॉक्टरांचेही आभार कारण त्यांच्यामुळे आम्हाला आईचा सहवास जास्त काळ मिळाला. आता पुन्हा कामावर रुजू व्हायची वेळ आलीय. आमच्या कामाचा तिला कायम अभिमान वाटत आलाय. मला आता या दुःखातून सावरण्यासाठी जास्त वेळ नकोय. हे दुःख आता मनात कायम राहणार आहे. मला तिची आठवण काढायची नाही कारण ती कायम माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. युनिवर्सची मी आभारी आहे की आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आता कोणत्याही गोष्टीचा शोक नाही. मी आईचं कायम कौतुक करेल. तुम्हा सर्वांचे आभार." अशी भावुक पोस्ट फराहने लिहिली आहे. अशाप्रकारे आईच्या निधनाच्या दुःखापासून सावरत फराह कामावर परतली आहे.