मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय कपल आहे. यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्यामुळे विराजसच्या कुटुंबासोबत शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांची खूप लाडकी आहे. अनेकदा ते समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्याचप्रमाणे शिवानीच्या कामाचीही मृणाल प्रशंसा करताना दिसतात. आता त्यांनी शिवानीसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
शिवानी रांगोळेचा काही दिवसांपूर्वी कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा तिचा पहिलाच कवितासंग्रह आहे. रेन्स कॉफी अँड टुमॉरो असे या कविता संग्रहाचं नाव आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध झाला. पण आता हा कवितासंग्रह रसिकांना ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या साइटवरूनही विकत घेता येणार आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीने पोस्ट केलेला पुस्तकाचा एक फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवानीच्या हातात तिचा कवितासंग्रह दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, शिवानीचं पहिलं पुस्तक…! त्यांनी शेअर केलेला या पोस्टमधून त्यांना आपल्या सूनेबद्दल किती कौतुक आणि प्रेम वाटतं हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या पोस्टवर त्यांचे चाहते कमेंट्स करत शिवानीला शुभेच्छा देत आहेत.
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे फक्त महिलांसाठी. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास ८ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.