Join us

एअरलिफ्ट: देशभक्तीचा नवा आदर्श

By admin | Published: January 23, 2016 2:22 AM

इराकने कुवेतवर १९९० मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर तेथील एक लाख सत्तर हजारांहून जास्त भारतीय नागरिक अडचणीत सापडले होते.

इराकने कुवेतवर १९९० मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर तेथील एक लाख सत्तर हजारांहून जास्त भारतीय नागरिक अडचणीत सापडले होते. अस्तित्वाचा संघर्ष करणाऱ्या या नागरिकांना वाचविण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली यावर आधारित चित्रपट ‘एअरलिफ्ट’ देशभक्ती आणि धाडसाचे मोठे उदाहरण आहे. त्या काळातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांनाही एका प्रवासाला घेऊन जातो. या चित्रपटाचे केंद्रस्थान आहे कुवेतमध्ये राहणारा उद्योगपती रंजित कात्याल (अक्षय कुमार). तो पत्नी अमृता (निमरत कौर) व मुलीसोबत चांगले आयुष्य जगत आहे. कुवेतवरील इराकच्या हल्ल्याने रंजित कात्यालचे आयुष्यच एका क्षणात बदलून जाते. कुवेतवर कब्जा करणाऱ्या इराकच्या सैन्याने रंजित आणि त्याच्या कुटुंबाला सकुशल बाहेर जाण्यासाठी मार्गही सांगितलेला असतो. पण रंजित तेथेच थांबतो, कारण त्याच्या सोबत ते सर्व भारतीय आहेत ज्यांचे भविष्य येथे अंधकारमय झालेले आहे. रंजित त्यांच्यासाठी लढतो. बगदादपासून ते दिल्लीपर्यंत संपर्क करून तो या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अनेक चढ-उतारांनंतर रंजित आपल्या मोहिमेत यशस्वी होतो. इतिहासातील सर्वात मोठ्या असलेल्या या मोहिमेत सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले जाते. वैशिष्ट्ये - युद्धाच्या क्षेत्रात अडकलेल्या भारतीयांची सुरक्षा आणि भविष्य यावर बनलेला हा चित्रपट तत्कालीन संवेदनांना बरोबर घेऊन पुढे जातो आणि नेमक्या याच कारणांमुळे हा चित्रपट दर्जेदार बनलेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी सर्वात मोठे काम काय केले असेल तर ते कुठेही भरकटताना दिसत नाहीत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ते यशस्वी होतात. त्या वेळची परिस्थिती काय असेल याची जाणीव चित्रपट पाहताना होत राहते. तेथे अडकलेल्या भारतीयांना संकटाच्या काळात एकटे सोडणे योग्य नाही, ही भावनाही महत्त्वाची आहे. भारतीयांशिवाय एक कुवेती महिला आणि तिचा मुलगा यांचे कथानकही चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. जॉर्डन एअरपोर्टवर तिरंगा फडकल्याचे दृश्य टाळ्यांच्या कडकडाटातच पाहिले जाते. कलाकारांबाबत बोलायचे तर अक्षय कुमारच्या करिअरमधील हा सर्वात चांगला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. रंजित कात्यालच्या भावभावनांना त्याने योग्य न्याय दिला आहे. याशिवाय निमरत कौर आणि प्रकाश बेलावाडी (जॉर्ज), पूरब कोहली (इब्राहिम), इनामुल हक (इराकी सेनेचे अधिकारी) यांनीही चांगला अभिनय केला आहे. कुमुद मिश्रा विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत प्रभावी वाटतात. चित्रपटाची पटकथा आणि संवाद चांगले आहेत. संगीतही श्रवणीय आहे. हा चित्रपट भारतीय असण्याची जाणीव करून देणारा आहे. हीच चित्रपटाची जमेची बाजू आहे. उणिवा - तसे पाहायला गेले तर चित्रपटात उणिवा अशा नाहीतच. कदाचित केवळ मनोरंजनाच्या बाजूचे प्रेक्षक या चित्रपटाशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. का पाहावा?उत्कृष्ट कथानक, अभिनय आणि देशभक्तीचे आदर्श उदाहरण म्हणून या चित्रपटाकडे पाहावे लागेल. का पाहू नये? फक्त मनोरंजन होणार नाही.