अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘एअरलिफ्ट’ने बॉक्स आॅफिसवर उंच भरारी घेतली आहे. इराकच्या आक्रमणावेळी कुवैतमध्ये अडकून पडलेल्या एक लाख ७० हजारांहून अधिक भारतीयांच्या सुटकेसाठी राबविलेल्या मोहिमेवर आधारित या चित्रपटाने, शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशीच १२ कोटींचा गल्ला गोळा केला. त्यानंतर शनिवारी १४ कोटी, रविवारी १७ कोटी असा चढता आलेख ठेवत, एअरलिफ्टने पहिल्या तीन दिवसांत ४४ कोटींहून अधिक रुपये कमावले.‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या मोहिमेवर आधारित या चित्रपटामध्ये, अक्षय कुमारने भारतीय व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. हा भारतीय स्वत:ला कुवैती मानतो. मात्र, इराकने कुवैतला वेढा घातल्यानंतर त्याला तो भारतीय असल्याची जाणीव होते आणि कुटुंबासह तेथून सुरक्षित बाहेर पडण्याऐवजी, तो तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी पाठविण्याच्या मोहिमेत स्वत:ला झोकून देतो. समीक्षकांची लाभलेली पसंती, तसेच प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया चित्रपटासाठी लाभदायक ठरल्या आहेत. २६ जानेवारीची सुट्टी आणि देशभक्तीच्या वातावरणाचाही या चित्रपटाला लाभ होईल, असे मानले जाते. येत्या काही दिवसांत ५० कोटींचा आकडा ओलांडल्यानंतरही चित्रपटाचा कमाईचा वेग कायम राहील, असे मानले जाते. एअरलिफ्टसह प्रदर्शित झालेल्या बालाजीच्या ‘क्या कूल हैं हम ३’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली सुरुवात केली होती. मात्र, शनिवारपासून या चित्रपटाच्या कमाईत घट सुरू झाली. पहिल्या दिवशी आठ कोटी रुपये कमावल्यानंतर शनिवारी त्याची कमाई पाच कोटी रुपयांपर्यंत खाली घसरली, तर रविवारी ती सहा कोटींच्या घरात राहिली. ‘क्या कूल...’ ने पहिल्या तीन दिवसांत २० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली. या चित्रपटाला मसाला मनोरंजन आवडणाऱ्या प्रेक्षकांचा आधार मिळाल्याचे मानले जाते. गेल्या शुक्रवारी ‘जुगनी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. मात्र, त्याला थोडीही चमक दाखवता आली नाही. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत उल्लेख करावा, एवढाही व्यवसाय केला नाही. नवे चेहरे असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. खासगी शाळांतील शिक्षकांवर शाळा व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अत्याचारावर आधारित चॉक अँड डस्टरला माध्यमांच्या पाठिंब्याचा लाभ मिळू शकला नाही. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट बॉक्स आॅफिसच्या स्पर्धेतून बाहेर पडला. विधु विनोद चोप्राच्या प्रॉडक्शन हाउसचा चित्रपट ‘वजीर’ ४० कोटींच्या कमाईसह बॉक्स आॅफिसवर स्थिरावला आहे. व्यवसायातील तज्ज्ञ या चित्रपटाला नव्या वर्षातील पहिला फ्लॉप चित्रपट मानत आहेत. येत्या शुक्रवारी दोन वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सनी लिओनचा चित्रपट ‘मस्तीजादे’ आणि राजकुमार हिरानीचा चित्रपट ‘साला खडूस’ यापैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो, हे लवकरच कळेल.
‘एअरलिफ्ट’ची उंच भरारी
By admin | Published: January 26, 2016 2:03 AM