ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणं अशक्य आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. टहम दिल दे चुके सनमट चित्रपटात एकत्र दिसलेली ही जोडी रिल आणि रिअल आयुष्यात पुन्हा कधी एकत्र आलीच नाही. बॉलिवूडचे एकेकाळचे हे लव्ह बर्ड्स विभक्त झाले ते कायमचेच. पण ऐश्वर्या रायने आपल्याला सलमनासोबत काम करण्यामध्ये कोणतीच समस्या नसल्याचं म्हटलं आहे. ब्रेकअपनंतर झालेला ड्रामा सर्वांनीच पाहिला होता, त्यामुळे ऐश्वर्याच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ऐश्वर्या रायने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला सलमनासोबत काम करण्यामध्य़े कोणतीच समस्या नसल्याचं सांगितल आहे. स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक चांगले असावेत या एका अटीवर आपण सलमान खानसोबत काम करायला तयार आहे, असं ऐश्वर्याने म्हटलं आहे. सलमानसोबत काम करण्यास ऐश्वर्याने जरी तयारी दर्शवली असली तरी सलमान यासाठी तयार होणं कठीण असल्याचं बॉलिवूडमधील अनेकांचं म्हणणं आहे.
ऐश्वर्या रायचा 'ए दिल है मुश्किल' सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती बिग बॉसमध्ये येईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. त्यानिमित्ताने का होईना पण सलमान आणि ऐश्वर्या एकत्र दिसतील.