अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या यांनी आजवर विविध सिनेमा आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाची छाप पाडलीय. ऐश्वर्या या सोशल मीडियावर सक्रीय आहेत. विविध रील्सच्या माध्मातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. ऐश्वर्या यांनी नुकताच एक वेगळा व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यामध्ये त्यांनी पावसापाण्याच्या दिवसात नागरीकांना सतर्कतेचं आवाहन केलंय. यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय.
ऐश्वर्या यांच्या गाडीत सापडली मांजराची पिल्लं
ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्या म्हणतात, "काल जरा एक गोंधळ झाला म्हणून आवर्जून हा व्हिडिओ करतेय. काल माझी गाडी सर्व्हिसिंगला गेली होती. एक दोन तासांनी सर्व्हिस सेंटर मधून मला फोन आला की, तुमच्या आजूबाजूला काही मांजर आहेत का? मी म्हटलं.. हो खूप आहेत. का काय झालं? तर ते म्हणाले तुमच्या गाडीत तीन मांजरांची छोटी बाळं सापडली आहेत. माझ्या पोटात गोळा आला कारण आदल्याच रात्री आमच्या बिल्डिंगमध्ये एका मांजराने तीन पिल्लांना जन्म दिला होता. त्यांना आम्ही बॉक्स मध्ये ठेवलं होतं."
ऐश्वर्या यांचं चाहत्यांना आवाहन
ऐश्वर्या पुढे सांगतात, "पावसापाण्याचे दिवस आहेत. पिल्लं सेफ राहावीत म्हणून आम्ही त्यांना बॉक्समध्ये ठेवलेलं. पण ती पिल्लं मांजराने माझ्या गाडीत कधी नेली कळलं नाही. गाडी १४ - १५ किलोमीटर चाललीं तरी ती बाळं सुरक्षित होती. ही अक्षरशः देवाची कृपा. मग त्या सर्व्हिस स्टेशनवरील माणसांनी त्या बाळांना आणून सोडलं. आता ते सगळे सेफ आहेत. यावरून मला आवर्जून सांगायचंय की, पावसापाण्याचे दिवस आहेत. तुमच्या आजूबाजूला मांजरं असतील. त्यांची पिल्लं असतील तर प्लीज गाडी सुरू करायच्या आधी बोनेट उघडुन पिल्लं आहेत की नाही ते बघा. गाडीच्या खालीही बघा. कारण आपल्याला कळत नाही आणि उगाच मांजरांचा जीव जाऊ शकतो. सो प्लीज एवढी काळजी घ्या." ऐश्वर्या यांच्या व्हिडीओचं चाहत्यांकडून कौतुक होतंय.