ऑनलाइन लोकमत -
अमृतसर, दि. २८ - सरबजीत सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं शूटींग वाघा बॉर्डरवर करण्यासाठी अखेर परवानगी मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांना वाघा बॉर्डरवर काही सीन शूट करायचे होते मात्र त्यांना परवानगी मिळत नव्हती. मात्र अखेर ऐश्वर्या रायने स्वत मध्यस्थी केल्याने वाघा बॉर्डरवर शूटींगसाठी परवानगी मिळाली आहे.
डीएनएने दिलेल्या माहितीनुसार सरबजीत चित्रपटाच्या शुटींगला वाघा बॉर्डरवर परवानगी मिळत नसल्याने सर्वजण गेले ३ आठवडे अमृतसरमध्येच अडकले होते. निर्मात्यांनी परवानगी मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र परवानगी मिळाली नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ऐश्वर्या रायला स्वत: परवानगी मागण्याची विनंती केली ज्यानंतर ही परवानगी मिळाली.
ऐश्वर्या रायने गृहमंत्रालयाच्या तसंच इतर संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून परवानगीची विनंती केली. स्वत:ऐश्वर्याने केलेली विनंती पाहून अधिका-यांनी ही परवानगी दिली. हा चित्रपट १९ मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सरबजीत सिंग यांची भूमिका साकारणार आहे. तर ऐश्वर्या राय त्यांच्या बहिणीची म्हणजे दलबीर कौर यांची भूमिका साकारणार आहे.
सरबजीत सिंग यांनी चुकून पाकिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिथे त्यांना अटक करण्यात आली होती. सरबजीत सिग यांना सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी खुप प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळाले नाही. सरबजीत सिंग यांचा कारागृहातच मृत्यू झाला होता.