Join us

या हिंदी सिनेमात पुन्हा एकदा अजय-अतुलच्या संगीताची जादू, बॉलीवूडला याड लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:56 PM

मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणबीर कपूरने म्हटले आहे.

मराठीतील सुपरहिट संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल. आपल्या एकाहून एक सरस आणि हिट चालींनी या जोडीने संगीतप्रेमींना अक्षरक्ष: याड लावले आहे. त्यामुळेच की काय या अजय अतुल जोडीचा डंका मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवुडमध्येही वाजतो आहे.हिंदी सिनेमांच्या गाण्यांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने सुमधुर चाली दिल्या. कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणाऱ्या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले. आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलीवुडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी येत आहे. 'शमशेरा' या आगामी सिनेमातून रसिकांना पुन्हा एकदा अजय-अतुलच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.यशराज फिल्म्स शमशेरा हा सिनेमा घेऊन येत आहे. करण मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. कोणत्याही सिनेमाच्या यशात त्या सिनेमाच्या संगीताचं मोलाचं योगदान असतं. त्यामुळेच की काय शमशेरा सिनेमाला संगीत देण्यासाठी आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या जोडीची निवड करण्यात आली आहे. या सिनेमाच्या संगीताच्या मेकिंगची प्रकिया सुरु असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. शमशेरा सिनेमाचा दिग्दर्शक करण मल्होत्राने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत संगीतकार अजय पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या शमशेरा सिनेमाच्या संगीताच्या मेकिंगची प्रक्रिया सुरु असल्याचे समोर आले आहे. करण आणि अजय अतुल या जोडीने याआधी 'अग्निप' या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या संगीताने रसिकांवर मोहिनी घातली होती. आता पुन्हा एकदा तशीच जादू अजय अतुलने शमशेरा सिनेमासाठी करावी अशी आस दिग्दर्शक करण आणि यशराज बॅनरला असेल. शमशेरा हा सिनेमा एका डाकूवर आधारित सिनेमा असेल. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर हटके अंदाजात एका डाकूच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 'संजू' सिनेमानंतर रणबीरच्या शमशेराची आणि अजय-अतुलच्या संगीताची रसिकांना उत्सुकता असेल. (Also Read:संजय दत्त आणि रणबीर कपूरच्या 'शमशेरा'मध्ये 'या' अभिनेत्रीची झाली एंट्री)

शमशेराबाबत बोलताना रणबीर म्हणाला, शमशेरा एक असा चित्रपट आहे जो करण्याची माझी इच्छा होती. मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार आहे.   

टॅग्स :अजय-अतुलरणबीर कपूर