ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, असं कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे.
‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय या पोस्टरमध्ये एक किल्लासुद्धा दिसत असून, त्यावर फडकणारा भगवा झेंडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. अजय देवगणच्या या नव्या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.
आणखी वाचा
‘या’ सेलिब्रिटींनी केले दुसरे लग्न!
"हसीना" श्रद्धा कपूरमुळे 22 वर्षात पहिल्यांदाच DDLJ चा शो रद्द
शाहरुखने सोन्याच्या ताटात घेतला जेवणाचा आस्वाद!
दिग्दर्शक ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढ्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी सिनेमाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. दिग्दर्शक ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य-एक युगपुरूष या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमातून लोकमान्य टिळकांचा इतिहास रूपेरी पडद्यावर मांडण्यात आला होता.
रितेश साकारणार ‘छत्रपती शिवाजी’
तानाजी मालुसरेंच्या सिनेमाबरोबरच आणखी एक ऐतिहासिक गाथा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. "छत्रपती शिवाजी" असं सिनेमाचं नाव असून अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आता रितेशला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी रसिक नक्कीच प्रचंड उत्सुक आहेत.