अजय देवगणचा ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सहाव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर तळ ठोकून आहे. काही राज्यांत टॅक्स फ्री असल्याने ‘तान्हाजी’ची कमाई सुरु आहे. भारतीय सिनेप्रेमींना ‘तान्हाजी’ने वेड लावलेच. पण आता तर जागतिक स्तरावरही ‘तान्हाजी’ने नवा विक्रम केला आहे. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण या सिनेमाने 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटींचा बिझनेस केला आहे. या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला. भारतातल्या कमाईचा आकडा बघाल तर गत 41 दिवसांत या चित्रपटाने 274 कोटींचा गल्ला जमवला.
जानेवारीच्या दुस-या आठवड्यात ‘तान्हाजी’ रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. इतकी की, दरदिवशी या सिनेमाने सरासरी 50 ते 60 लाखांची कमाई केली. या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉक बस्टर म्हणून ‘तान्हाजी’ने नवा विक्रम नोंदवला.
‘तान्हाजी’ पुढे गत दीड महिन्यांत रिलीज झालेल्या कुठल्याही सिनेमाचा टिकाव लागला नाही. छपाक, पंगा, जवानी जानेमन, मलंग, लव्ह आज कल असे अनेक चित्रपट आलेत आणि गेलेत. पण ‘तान्हाजी’ची जादू मात्र कायम राहिली. आज 41 दिवसांनंतरही या चित्रपटाची जादू ओसरलेली नाही. महाराष्ट्रात या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. पाचव्या आठवड्यात ‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या सिनेमासोबत ‘तान्हाजी’ची टक्कर झाली. मात्र या दोन्ही सिनेमांनी पहिल्याच आठवड्यात निराशा केली. त्यानंतर व्हॅलेन्टाईनच्या मुहूर्तावर रिलीज झालेला ‘लव्ह आज कल’ हा सिनेमाही कमाल दाखवू शकला नाही. साहजिकच ‘तान्हाजी’ची घोडदौड कायम राहिली.