Join us

आदिपुरुषवरुन अजय देवगणही झाला असता ट्रोल, वेळीच 'या' भूमिकेसाठी दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:14 AM

ओम राऊतच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सुपरहिट सिनेमात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. 

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करतोय. अगदी टीझर रिलीज झाल्यापासूनच सिनेमावर टीका होत होती. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर तर लोक भडकलेच आहेत.  हनुमानाच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद, रावणाचा लुक आणि काळी लंका, पात्रांची चुकीची निवड अशा अनेक कारणांनी सिनेमावर आक्षेप घेतला जातोय. ओम राऊतच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सुपरहिट सिनेमात अजय देवगणने (Ajay Devgn) मुख्य भूमिका साकारली होती. 'आदिपुरुष'मध्येही एका भूमिकेसाठी अजय देवगणला ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ऑफर नाकारली.

'आदिपुरुष' सिनेमात प्रभासने श्रीरामाची तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. दोघांनाही भूमिका चांगल्याप्रकारे साकारता आल्या नसल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय. रावणाची भूमिका तर प्रचंड ट्रोल होतेय. काळी लंका, रावणाला चक्क वेल्डिंगचं काम करताना दाखवलंय, त्याची हेअरस्टाईल अशा अनेक कारणांवरुन रावण ट्रोल झालाय. पण रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खान पहिली पसंती नव्हताच. होय अजय देवगणला आधी रावणाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र त्याने व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत ऑफर नाकारली होती. नंतर सिनेमा सैफ अली खानला ऑफर करण्यात आला. 

प्रेक्षकांनी आदिपुरुषची प्रचंड खिल्ली उडवली आहे. तर अजय देवगण या भूमिकेसाठी योग्य ठरला असता अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे. याउलट बरं झालं अजय देवगणने भूमिका नाकारली असं काही जणांचं म्हणणं आहे. एकंदर आदिपुरुषचा वाद पाहता यातून अजय देवगण बचावला हे नक्की. 

आदिपुरुषची कमाई

16 जून रोजी आदिपुरुष रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी सिनेमाने ५० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. नंतर कमाईत काहीशी घट झाली. ५ दिवसात आदिपुरुषने 247.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये प्रचंड घट झाली. काल चित्रपटाने केवळ  7.50 कोटींचा धंदा केला.

टॅग्स :अजय देवगणआदिपुरूषसैफ अली खान बॉलिवूड