निर्माते बोनी कपूर हे लवकरच अभिनेते अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक दिवसांपासून या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. नुकतंच अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात क्रीडा जगतात भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळाची झलक पाहायला मिळत आहे. एकूणच मैदानाचा हा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे.
2 मिनिटं 43 सेंकदाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त संवाद आणि दृश्य पाहायला मिळत आहे. अजय देवगनने पुन्हा एकदा आपल्या अभिनयच नाणं खणखणीत वाजवल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. अंगावर रोमांच उभे करणारा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये कोलकात्याच्या मैदानातून भारतीय फुटबॉलचा उदय ते प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या कठोर संघर्षाची एक झलक पाहायला मिळत आहे.
'मैदान' या सिनेमात 1956 ते 1962 या काळातील भारतीय फुटबॉल टीम आणि त्यांचे प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांचा काळ दाखवण्यात येणार आहे. हा काळ भारतीय फुटबॉल टीमचा सुवर्णकाळ होता. 1956 मध्ये भारतीय टीम मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये पोहोचली होती आणि यात भारतीय टीमनं सेमिफायनल पर्यंतचा पर्वास केला होता. यानंतर कोणतीही भारतीय फुटबॉल टीम अशी कामगिरी करु शकलेली नाही.
अजय देवगणसाठी "मैदान" हा चित्रपट खूप खास आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक अमित शर्मा असून त्याने यापूर्वी आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' आणि अर्जुन कपूर अभिनित 'तेवर' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अजय देवगण माजी भारतीय फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत जवान फेम अभिनेत्री प्रियामणीही मुख्य भूमिकेत आहे. अजय देवगणच्या 'मैदान'चा हा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्यात मोठ्या पडद्यावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.