मुंबई : ‘द ट्रायल’ या वेबसिरीजच्या माध्यमातून दमदार पुनरागमन केलेल्या अभिनेत्री काजोलने मुंबईतील ओशिवरा येथे १९४ चौरस मीटर आकाराचे आलिशान कार्यालय खरेदी केले आहे. याकरिता काजोलने ७ कोटी ६४ लाख रुपये मोजल्याची माहिती आहे. एवढ्या आकारमानाच्या जागेसाठी तिने मोजलेली सात कोटी किंमत हादेखील या परिसरातील किमतीचा विक्रम असल्याचे मानले जात आहे. अलीकडेच तिने २,४९३ चौरस फुटांचा एक आलिशान फ्लॅट १६ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केला आहे.
लखनौ, अहमदाबादमध्येही गुंतवणूक ओशिवरा येथील वीरा देसाई रोड येथे बहुतांश सिनेकलाकारांची कार्यालये आहेत. त्याच परिसरात काजोलने हे कार्यालय खरेदी केले आहे. काजोलप्रमाणेच तिचा नवरा आणि अभिनेता अजय देवगण यानेदेखील या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरात अजय देवगण याने पाच कार्यालयांची खरेदी केली आहे. यापैकी तीन कार्यालयांची किंमत आता ३० कोटी ३५ लाख रुपये इतकी असून, उर्वरित दोन कार्यालयांची किंमत १४ कोटी ७४ लाख रुपये इतकी आहे. तर, लखनौ आणि अहमदाबाद येथील काही सिनेमागृहांच्या पुनर्विकासामध्येदेखील अजय देवगण याने मोठी गुंतवणूक केल्याचे समजते.