Join us

'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- "दिग्पालने सुरुवात केली नसती तर..."

By कोमल खांबे | Updated: April 15, 2025 12:05 IST

'छावा'मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास घराघरात पोहोचला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुकही झालं. आता या सिनेमाबाबत अभिनेता अजय पुरकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शित होताच सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'छावा'मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास घराघरात पोहोचला. या सिनेमाचं सर्वत्र कौतुकही झालं. आता या सिनेमाबाबत अभिनेता अजय पुरकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 

'छावा'चं श्रेय दिग्पाल लांजेकर आणि टीमचं आहे!

'तारांगण'ला दिलेल्या मुलाखतीत अजय पुरकर म्हणाले, "छावा सिनेमा फर्जंदमुळे घडला. फर्जंद नसता तर 'छावा' आलाच नसता. त्यामुळे सुरुवात दिग्पाल लांजेकरनेच केली आहे. आणि म्हणूनच छावा येतोय. कारण, २०१८-१९ला जेव्हा फर्जंद आला तेव्हा कोणाला 'छावा' करावासा वाटला नाही. म्हणजे ते श्रेय आमच्या टीमचं आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदारमुळे लोकांना कळलं की इतिहास पोहोचवणं किती महत्त्वाचं आहे. आणि चांगली टीम असेल तर तो चांगल्या पद्धतीने पोहोचवला जाऊ शकतो. मला वाटतं हे टीमचं यश आहे. आणि आनंद आहे की फर्जंदपासून सुरू झालेला शिवछत्रपतींचा इतिहास शंभूमहाराजांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि आता तो 'छावा' सिनेमाच्या माधम्यातून लोकांपर्यंत पोहोचतो आहे, याचा आनंद आहे". 

"शिवछत्रपतींचा इतिहास हा हिंदीतून तितका पोहोचू शकत नाही"

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर करायला आवडेल, असा प्रश्न विचारताच अजय पूरकर म्हणाले, "पण, शिवछत्रपतींचा इतिहास हा हिंदीतून तितका पोहोचू शकत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कायम म्हणतो की राजं म्हटल्यावर जे होतं ते महाराज किंवा राजंजी म्हणून होत नाही. राजं म्हटल्यावर जी भावना मनात येते तीच खरी. पण, देशपातळीवर जायचं असेल तर सध्या डबिंगचं माध्यम उपलब्ध आहे. तर चांगले आर्टिस्ट घेऊन ते करता येऊ शकतं. उद्या मी महाराणा प्रताप यांची भूमिका मराठीतून करायची म्हटलं तर ते राजस्थानी लोकांना आवडणारे का? ते ज्या पद्धतीने राणाजी म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला कदाचित नाही म्हणता येणार". 

टॅग्स :'छावा' चित्रपटअजय पुरकरदिग्पाल लांजेकरसिनेमा