जगभरात जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हापासून विविध इंडस्ट्रीतील बेरोजगारांची संख्याही वाढू लागली. तसाच परिणाम बॉलिवूडवरही झाला. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मजूरांचे देखील हाल होत आहेत. याकाळात अनेक सेलिब्रिटींनी गरजूंची मदत केल्याचे दिसून आले आहे. आता असाच दिलदारपणा अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी देखील दाखवला आहे. ते दोघे फाईट मास्टर्स आणि स्टंटसमॅनच्या मदतीसाठी पुढे सरसावले असल्याचे दिसून आले आहे.
बॉलिवूडमधून मदतीचा ओघ वाढत असतानाच अजय देवगणने इंडस्ट्रीच्या फेडरेशनसाठी ५० लाख रूपयांची मदत देऊ केली होती. मात्र आता त्याने विशेषत्वाने स्टंटससाठी जे लोक काम करतात त्यांच्यासाठी त्याने मदत देऊ केली आहे. अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांनी दिग्दर्शनाचे काम पाहिले आहे. तसेच त्यांचे स्टंट्समॅन आणि फाईटर्ससोबत विशेष नाते असल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनुसार, अजय देवगणने ३५० लोकांच्या खात्यात ५ हजार रूपये एवढी रक्कम जमा केली आहे. ज्यामुळे ते त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकतील.
बॉलिवूडचा अॅक्शन मॅन टायगर श्रॉफ हा देखील आता स्टंटसमॅन म्हणूनच ओळखू लागला आहे. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे देखील गरीबीतून कष्ट उपसत मोठे स्टार झाले आहेत. त्यामुळे टायगरला गरीब लोकांच्या काय गरजा असतात? हे तो ओळखून आहे. त्यामुळे त्याने स्टंट्समॅनच्या ३५० घरांसाठी रेशन आणि महत्त्वाच्या गोष्टीही देऊ केल्या आहेत. ज्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत त्याच्या दररोजच्या गरजा भागतील.