महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील विजेता असल्याने त्याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यासोबत राजकीय नेत्यांनीदेखील सुरजचे कौतुक केले आहे. सूरज चव्हाणसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा सूरज ट्रॉफी जिंकल्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहलं, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!".
अजित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे यांसारख्या अनेक मोठमोठ्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे सुरजचं कौतुक केलं. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर 14 लाख रुपये, 10 लाखांचं गिफ्ट व्हाऊचर आणि ईव्ही बाईक बक्षीस म्हणून मिळाली आहे. टॉप 3 सदस्यांमध्ये सूरज, अभिजीत आणि निक्की हे सदस्य होते निक्की बाहेर गेल्यावर सूरज आणि अभिजीत यांच्या टक्कर होती. ज्यामध्ये सूरज चव्हाण जिंकला. सूरज चव्हाण विजेता तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला.