Ajit Pawar On Suraj Chavan New Home : 'बिग बॉस मराठी' संपल्यानंतर नेते अजित पवार यांनी सूरज चव्हाणची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्याचं कौतुक करत त्यांनी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याचं सांगितलं. नुकताच सूरजच्या गावी नवीन घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. आता यानंतर आपल्या नव्या हक्काच्या घरात सुरज कधी गृहप्रवेश करणार याचा मुहूर्त अजित पवारांनी सांगितला आहे.
नुकतेच सुरज हा अजित पवारांच्या बारामती सभेत हजर राहिला. यावेळी त्याने अजित पवारांना मतदान करण्याचे आवाहन केलं. तर आपल्या भाषणात अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घरासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुरज त्याच्या नवीन घरात प्रवेश करेल, असा शब्द अजित पवार यांनी भरसभेत दिला.
अजित पवार म्हणाले, "आज सूरज पण येथे आला आहे. तसं बघितलं तर मी सूरजला काही दिवसांपुर्वी भेटलो. एका रामोशी समाजामध्ये जन्माला आलेला सुरज. लहाणपणी आई-वडिलांच छत्र हरवलं. पाच बहिणी आहेत. आपल्या मोढवेसारख्या गावात राहून त्याने शिकायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तो शाळेत गेला नाही. पण तो बिग बॉसमध्ये गेला आणि त्याने सगळ्यांवर बॉसगिरी दाखवली आणि बिग बॉसचा विजेता झाला. सूरजने बिग बॉस शो जिंकल्यामुळे तमाम महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना त्याचा अभिमान आहे".
पुढे अजित पवार म्हणाले, "आता आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी एक चांगलं घर बांधायचं ठरवलंय. सूरजच्या घराचा प्लॅन तयार आहे, त्याला नव्या घराचा प्लॅन आवडला आहे. वर्षभरात सूरजचं घर पूर्ण होईल. पाहा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, पुढच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूरज तू नव्या घरात प्रवेश करायचा आहे, हा आपला वादा आहे आणि दादांचा शब्द किती खरा असतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय. मी माझा शब्द मोडत नसतो..!".