‘सैराट’ काय मिळाला आणि आकाश ठोसरचं (Akash Thosar) नशीब एका रात्रीत बदललं. या सिनेमात त्याने साकारलेली परश्याची भूमिका प्रचंड गाजली. ‘सैराट’चा हा परश्या आता परश्या राहिलेला नाही तर मोठ्ठा स्टार झाला आहे. ‘सैराट’नंतर त्याचा मेकओव्हर पाहून अनेकदा विश्वास बसत नाही. ‘सैराट’मध्ये आकाश खरं तर सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार होता. त्यासाठी त्याचं ऑडिशनही घेतलं होतं. पण त्याचा अभिनय असा की, तो लीड भूमिकेसाठी सिलेक्ट झाला. ‘सैराट’ या सिनेमानं आकाशला काय दिलं तर यश, लोकप्रियता, पैसा, प्रसिद्धी सगळं काही. शिवाय या सिनेमानं त्याच्या आयुष्याची दिशाचं बदलली. ‘सैराट’ आकाशकडे निर्माता दिग्दर्शकांची रांग लागली. पण आकाशने प्रत्येक सिनेमा अगदी काळजीपूर्वक निवडला. ‘सैराट’नंतर अगदी मोजक्याच सिनेमात तो दिसला. यामागचं कारण माहितीये...? तर प्रेम गमावण्याची भीती.. होय, हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आकाशने यामागचं कारण सांगितलं.
तो म्हणाला...‘सैराट’ या सिनेमानं मला खूप काही दिलं. या सिनेमाबद्दल माझ्यामनात खूप प्रेम आहे. कुठल्याही कलाकाराला त्याच्या डेब्यू सिनेमासाठी इतकं प्रेम मिळाल्याचं मी पाहिलेलं नाही. आज तीन चार वर्षानंतर मी प्रमोशनसाठी बाहेर पडलोय, पण आजही सैराटची क्रेझ कायम आहे. प्रत्येकाच्या नशीबात इतकं प्रेम नसतं. लोकांनी मला इतकं भरभरून प्रेम दिलं की आता ते प्रेम गमावण्याची भीती वाटते. त्यामुळे गेल्या सहा वर्षांच्या करिअरमध्ये मी अगदी निवडक सिनेमे केलेत. प्रेक्षकांचं माझ्यावर असलेलं प्रेम कमी होईल, असं काहीही मला करायचं नाहीये. त्यामुळे फक्त पैशांसाठी मला मिळेल ते सिनेमे साईन् करायचे नव्हते. ‘सैराट’ने मला कल्पनेपलीकडचं प्रेम दिलं होतं. हे प्रेम मला गमवायचं नव्हतं. कारण त्यानंरचा एकही सिनेमा फ्लॉप झाला तर मी 'वन फिल्म वंडर' ठरलो असतो. मी एक मध्यमवर्गीय कुटुुंबातला मुलगा आहे. मनासारखी नोकरी करायची आणि आईवडिलांचा सांभाळ करायचा, आयुष्यात सेटल व्हायचं, इतकंच माझं स्वप्न होतं. पण ‘सैराट’ने मला यापेक्षा कितीतरी काही दिलं. अभिनेता होण्याची संधी या सिनेमानं मला दिली होती आणि ही संधी मला हलक्यात घ्याची नव्हती. यापुढेही मला ही संधी हलक्यात घ्यायची नाही, असं आकाश म्हणाला.
आजही अण्णांचा सल्ला घेतो...‘सैराट’नंतर त्याच धाटणीच्या अनेक भूमिकांसाठी आकाशला विचारणा झाली. तो म्हणाला, मला परश्याच्या धाटणीच्या अनेक भूमिका ऑफर झाल्यात. अनेकदा नाही म्हणणं कठीण होतं. पण मी मॅनेजरच्या माध्यमातून अगदी विनम्र नकार कळवतो. आजही नवी एखादी भूमिका ऑफर झाली की मी नागराज अण्णांचा सल्ला घेतो.
आकाशचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित आहे. यात असून आकाश, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.