मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. सध्या अक्षयचा 'पृथ्वीराज' हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असून नुकतेच या सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला आहे. मात्र, सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अक्षयला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यामुळे आता अक्षय कुमारला कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावता येणार नाही.
अक्षय कुमारला गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. राम सेतू चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अक्षयला कोरोनाने गाठले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा कोरोनाने अक्षयला गाठले आहे. अक्षयने कोरोनाच्या कालावधीत तब्बल 25 कोटी रुपयांची मदत पीएम केअर फंडासाठी केली होती. त्यावरुन, अक्षयच्या संवेदनशीलतेचं कौतूक करण्यात आलं होतं.
अक्षयचा पृथ्वीराज सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार
दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज या सिनेमाचा भव्य ट्रेलर लॉन्च केला. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील आहे. या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. आपल्या 'पृथ्वीराज' या ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या विशेष प्रसंगी अक्षय कुमार म्हणाला की, मला अभिमान आहे की मला भारताचा महान सुपुत्र सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये मला अशा प्रकारच्या भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली नव्हती. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदींनी जेव्हा ही महान व्यक्तिरेखा साकारायला सांगितली तेव्हा मला माझे जीवन सफल झाले आहे, असं वाटलं.'