संपूर्ण देशात सध्या दिवाळीनिमित्त मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अयोध्येत जोमाने तयारी सुरू आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येतील आपल्या घरी परतलेले प्रभू रामलला दीपोत्सव साजरा करणार आहेत. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जगभरातून प्रभू श्रीरामाचे भक्त दिवाळीला अयोध्येला पोहोचत आहेत. लाखो लोक दिव्यांचा भव्य उत्सव पाहणार आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अयोध्येतील माकडांसाठी एक मोठा निर्णय घेतला.
अक्षय कुमारने अयोध्येतील माकडांसाठी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याने ही रक्कम माकडांना अन्न पुरवण्यासाठी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माकडांना खायला घालण्याचा उपक्रम अंजनेय सेवा ट्रस्टकडून घेतला जात आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, ट्रस्टचे प्रमुख, जगतगुरु स्वामी राघवाचार्य जी महाराज यांनी अक्षय कुमारला या उदात्त कार्यात सामील होण्यास सांगितले आणि अभिनेत्याने लगेच होकार दिला.
ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले, की अक्षय हा त्याचे पालक हरिओम भाटिया, अरुणा भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने विविध कारणांसाठी सक्रियपणे देणगी देताना दिसतो. ट्रस्टचे सदस्य म्हणाले, "अक्षय केवळ एक उदार देणगीदार नाही. तर तो भारताचा एक सामाजिक जागरूक नागरिक देखील आहे. त्याला अयोध्येतील नागरिकांची आणि शहरातील नागरिकांची तितकीच काळजी होती. त्यामुळे माकडांना खाऊ घालताना कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही आणि माकडांना खायला दिल्यावर अयोध्येच्या रस्त्यावर कचरा पसरणार नाही याची आम्ही काळजी घेऊ".
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय त्याच्या 'सूर्यवंशी'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांचा समावेश आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.