Join us

Akshay Kumar : लक्षात ठेव..., अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 4:21 PM

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : छत्रपती शिवरायांचा भूमिकेतील फर्स्ट लुक शेअर केल्यावर अक्षय पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : रूपेरी पडद्यावर सम्राट पृथ्वीराज बनल्यानंतर आता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. खरं तर, यावरून अक्षय आधीच प्रचंड ट्रोल झाला आहे. अक्षय छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर सोशल मीडियावर अक्षयची जबरदस्त खिल्ली उडवली गेली होती. त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता छत्रपती शिवरायांचा भूमिकेतील फर्स्ट लुक शेअर केल्यावर अक्षय पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

आजपासून ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. अक्षयने या चित्रपटातील आपली पहिली झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला. यात अक्षय शिवरायांच्या भूमिकेत दिसतोय. त्याचा हा फर्स्ट लुक काही चाहत्यांना आवडला आहे. पण अनेकांनी यावरून पुन्हा एकदा अक्षयला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

‘म्हणजे तू आणखी एक सिनेमा 40 दिवसांत शूट करून खराब करणार,’ असं एका युजरने लिहिलं. ‘भावा, अ‍ॅक्टिंग चांगली कर. महिनाभरात सिनेमा पूर्ण करण्याचा विचारही करू नकोस,’ अशी तंबीच एका युजरने अक्षयला दिली. ‘आमच्या राजाचा अपमान करू नका. अक्षय कुमार तुम्ही आमच्या दैवताच्या भूमिकेत शोभत नाही,’ असं एका युजरने लिहिलं. ‘मी अक्षयचा खूप मोठा चाहता आहे पण मला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य नाही वाटत,’असंही एका युजरने म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरच उत्तम, अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

अजय देवगणने दिल्या शुभेच्छा

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड अनेकांना आवडलेली नाही. पण बॉलिवूडचे त्याचे सहकलाकार मात्र त्याला या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. अजय देवगणने खास पोस्ट करत अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रिय अक्षय, तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहे. शिवाजी महाराज हे माझे आवडते मराठी नायक आहेत.  छत्रपती शिवायांची महती सांगणारा आणखी एक सिनेमा येतोय, याचा मला आनंद आहे,’असं अजयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं असून अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत.

म्हणून अक्षयने स्वीकारली भूमिका चित्रपटाच्या घोषणेवेळी अक्षय कुमारने हा सिनेमा स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं होतं. ‘मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन,’असं तो म्हणाला होता.

‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुज्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडमहेश मांजरेकर मराठी चित्रपट