Akshay Kumar on Hindu Kings:अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहानांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिता आणि सोनू सूद आणि संजय दत्तही प्रमुख भूमिकेत आहेत. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, त्याने भारतीय इतिहासावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
'पुस्तकात फक्त मुघलांची माहिती'टाईम्स नाऊ नवभारतच्या शोमध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, 'आपल्या शालेय पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान आणि आपल्या हिंदू राजांबद्दल फक्त चार ओळी लिहील्या आहेत. पण, मुघल साम्राज्याचा इतिहासाबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. याकडे धर्माच्या दृष्टीने नव्हे तर संस्कृतीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास गंगेपासून सोमनाथ मंदिरापर्यंत जातो, त्यानंतर तो दिल्लीत येतो पण, त्याबद्दल अतिशय कमी माहिती दिली जाते.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्येही अक्षयने हाच मुद्दा उपस्थित केला. तो म्हणतो की, 'आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हिंदू राजांबद्दल कोणीच लिहीत नाही. मी शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करू इच्छितो. आपल्याला मुघलांबद्दल माहिती असली पाहिजे परंतु आपल्या राजांबद्दलही माहिती पाहिजे,' असं अक्षय म्हणाला.
चंद्रप्रकाश द्विवेदी काय म्हणाले..?सम्राट पृथ्वीराजचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले की, 'आपला इतिहास वैदिक काळापासून सुरू होतो. पण, वैदिक कालखंडाचा इतिहास आणि चंद्रगुप्त मौर्यांबद्दल फक्त एकच पॅराग्राफ लिहीला जातो. त्यानंतर आपण विकास केला नाही, असे नाही. त्या काळात भारताचा मोठा इतिहास घडून गेलाय. पण, हा इतिहास ज्याने लिहिला त्याने अनेक गोष्टी लपवल्या आहेत.'