अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) काल देशभरातील 4000 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. चाहते दीर्घकाळापासून या चित्रपटाकडे डोळे लावून बसले होते. त्यांचा हा उत्साहच त्यांना चित्रपटगृहांपर्यंत घेऊन गेला. होय, पहिल्याच दिवशी ‘सूर्यवंशी’ केलेली कमाई बघता असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ पहिला मोठा चित्रपट आहे. सूर्यवंशीला महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सूर्यवंशी’मुळे चित्रपटगृहांना पुन्हा झळाळी प्राप्त झाली आहे. उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर अक्षयचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा एक विक्रम आहे. भारतात 4 हजार स्क्रीन्सवर तो रिलीज झाला आहे. .
पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, काल शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’ पहिल्या दिवशी 26 कोटींचा बिझनेस केला. सुरूवातीला चित्रपटाला संथ प्रतिसाद मिळाला. पण नंतर प्रेक्षकांची गर्दी वाढली. ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा मार्च 2020 मध्येच रिलीज होणार होता. पण कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहांना कुलूप लागलं आणि ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन रखडलं. या काळात अनेक मेकर्सनी आपले सिनेमे ओटीटीवर रिलीज केलेत. पण दिग्दर्शक रोहित शेट्टीनं ‘सूर्यवंशी’ रिलीज करेल तर थिएटरमध्येच, असा निर्धार केला होता. शेवटपर्यंत तो यावर ठाम राहिला आणि काल त्याचा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला.
‘सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. सिंघम आणि सिम्बा नंतर हा चित्रपट तिसरा कॉप युनिव्हर्स इन्स्टॉलमेंट आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंग हेही कॅमिओ रोलमध्ये आहेत.
प्रदर्शित होण्यापूर्वीच 200 कोटींची कमाई प्रदर्शित होण्याआधीच ‘सूर्यवंशी’ चे ओटीटी हक्क 200 कोटींना विकले गेले आहेत. म्युझिकचे हक्क विकून 60 कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी 200 कोटींचा खर्च आल्याचं बोललं जातं असून चित्रपटाच्या प्रमोशनवर 25 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय.