Akshay Kumar Marathi Debut: बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे शूटींग सुरू केले आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात'(Vedat Marathe Veer Daudle Saat) या चित्रपटात अक्षय कुमारछत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील कलाकारांच्या नावांची घोषणा झाली होती.
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची लॉन्चिंग झाली होती. या चित्रपटात प्रवीण तरडेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, त्याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार असेल, असे जाहीर करण्यात आले होते. त्याच दिवशी अक्षयचा महाराजांच्या भूमिकेतील एक फोटोही जारी करण्यात आला होता.
त्यानंतर आता आज अक्षयने एक फोटो आणि शॉर्ट व्हिडिओही अपलोड केला आहे, ज्यात तो शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. या व्हिडिओसह अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करत आहे. यात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने प्रेरणा घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन!'' हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार असून, याचे पहिले शेड्यूल आज(6 डिसेंबर, 2022) पासून सुरू झाले आहे.