अक्षय कुमारचे (Akshay Kumar) एकापाठोपाठ एक सलग तीन सिनेमे दणकून आपटले. तेव्हापासून अक्की सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. अशात अक्षय कुमारने महिनाभराचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या ब्रेकमागचं कारणही खास आहे. अक्षय आपल्या कुटुंबासोबत लंडनला रवाना झाला आहे. अक्षय कुमार संपूर्ण महिनाभर विदेशात राहणार असल्याचं कळतंय. आता अक्षयच्या विदेश दौऱ्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागे एक खास कारण आहे. हे कारण म्हणजे, त्याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna).होय, अक्षयची पत्नी ट्विंकल एक लेखिका आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता ती आणखी एक उपलब्धी मिळवणार आहे.
फिक्शन राइटींगमध्ये ती मास्टर डिग्री करणार आहे आणि यासाठी तिने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये प्रवेश घेतला आहे. ट्विंकलला लंडनला सोडण्यासाठी अक्षय गेला आहे. आरव व नितारा ही दोन्ही मुलंही त्यांच्यासोबत आहेत. येत्या 9 तारखेला अक्षयचा वाढदिवस आहे. हा वाढदिवसही अक्षय कुटुंबासोबत लंडनमध्ये साजरा करणार आहे. यानंतर तो परत येईल आणि ट्विंकल तिचा कोर्स पूर्ण करण्यासाठी लंडनमध्येच थांबेल.
अक्षय हा बॉलिवूडचा सर्वात बिझी स्टार आहे. सिनेमे त्याच्या नावावर चालतात. अर्थात गेल्या काही दिवसांत चित्र बदललंय. अक्षयचे सिनेमे लागोपाठ फ्लॉप होत आहेत. ‘बच्चन पांडे’ आपटला. पाठोपाठ आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ही दणकून आपटला आणि यानंतरचा ‘रक्षाबंधन’ हा त्याचा सिनेमाही फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसला. एकापाठोपाठ एक सलग तीन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयने चिंतन-मंथन सुरू केलं आहे. या फ्लॉप सिनेमांची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. याशिवाय आणखी एक मोठा निर्णयही घेतला आहे. होय, आगामी सिनेमांसाठी अक्षयने त्याची फी कमी केली आहे. आश्चर्य वाटेल पण आधी एका चित्रपटासाठी 70-75 कोटी रुपए घेणारा अक्षय आता फक्त 9 ते 18 कोटी रुपए घेणार आहे. अर्थात ज्या चित्रपटांचा तो निर्माता नसेल, त्या चित्रपटाच्या नफ्यात तो 50 टक्के वाटा घेणार आहे.