कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने कलाविश्व हादरलं आहे. 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' सारख्या कित्येक सिनेमांचं डोळे दिपवणारं कलादिग्दर्शन करणारे नितीन देसाई अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलतील याची कोणीही कल्पनाही केली नसेल. अतिभव्य आणि सुंदर सेट उभारण्यात त्यांचा हात धरणारं कोणीच नसेल. मराठी माणसाला अभिमान वाटेल आणि हिंदीलाही टक्कर देईल असा ND स्टुडिओची त्यांनी कर्जत येथे स्थापना केली. त्यांच्या अकाली एक्झिटनं सगळ्यांचा धक्का बसला आहे.
अभिनेता अक्षय कुमार याला देखील नितीन देसाईंच्या आत्महत्येनं धक्का बसला आहे. ट्विटरवर त्याने देसाईंना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. याच सोबत अक्षयने एक निर्णय देखील घेतला आहे.
अभिनेत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ते प्रॉडक्शन डिझाईनमध्ये एक दिग्गज होते आणि सिनेइंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग होते. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हे हिंदी चित्रपटसृष्टीचे आणि आपल्या सर्वांचे मोठे नुकसान आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून आज OMG 2 चा ट्रेलर प्रदर्शित होणार नाही. ओम शांती."
नितीन देसाईंवर होतं कर्जनितीन देसाई यांनी एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड या कंपनीसाठी १८५ कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं. हे कर्ज एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ईसीएल फायनान्स या कंपनीकडून २०१६ आणि २०१८ या दोन वर्षांत घेण्यात आलं होतं. परंतु, कर्जाच्या परतफेडीमध्ये जानेवारी २०२०पासून अनियमितता आढळून येऊ लागली. त्यामुळे त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती.
काय घडलं आत्महत्येच्या दिवशी?नितीन देसाई काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. त्यामुळे दिल्ली दौरा संपवून मुंबईत आल्यानंतर त्यांनी थेट कर्जतचा एन. डी स्टुडिओ गाठला. स्टुडिओत गेल्यावर थोडा वेळ तिथे बसल्यानंतर ते दुसऱ्या मजल्यावर गेले आणि गळफास घेतला, अशी माहिती त्यांचे सहकारी दिलीप पिठवा यांनी दिली.