Join us

अक्षय कुमारची 'ती' सायकलही देणार समाजकार्यात योगदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 11:47 AM

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणारा आणि नेहमीच गरजूंच्या हाकेला 'ओ' देणारा सहृदय अभिनेता अक्षय कुमार आता महिलांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

मुंबईः शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते मदत करणारा आणि नेहमीच गरजूंच्या हाकेला 'ओ' देणारा सहृदय अभिनेता अक्षय कुमार आता महिलांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. 'पॅडमॅन' या चित्रपटात त्याने वापरलेल्या सायकलचा लिलाव करून तो 'पॉप्युलेशन फर्स्ट' या संस्थेला आर्थिक सहकार्य करणार आहे. 

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन स्वस्तात बनवण्याचं तंत्र शोधून काढणारे आणि खेडोपाडी जाऊन महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनबाबत जागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री अरुणाचलम मुरुगनानथम यांचा प्रेरणादायी प्रवास 'पॅडमॅन' या चित्रपटात आहे. त्यात अरुणाचलम यांची भूमिका अक्षय कुमारनं साकारलीय. अरुणाचलम यांच्या आयुष्यात त्यांची सायकल हा अविभाज्य भाग राहिलाय. म्हणूनच, या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये अक्षय एका सायकलवर बसलेला पाहायला मिळतोय. स्वाभाविकच, या सायकलला वेगळं महत्त्व, वलय प्राप्त झालंय. त्याचाच फायदा सामाजिक कार्यासाठी करून घ्यायचं अक्षय आणि ट्विंकलनं ठरवलंय. 

'पॅडमॅन' चित्रपटात वापरलेल्या सायकलचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यातून जो निधी मिळेल, तो 'पॉप्युलेशन फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेला दिला जाईल. ही संस्था गेली अनेक वर्षं महिलांच्या आरोग्याबाबत काम करतेय. 101 गावांमध्ये त्यांच्या कार्याचा विस्तार आहे. त्यांचं काम पाहून अक्षय - ट्विंकल प्रभावित झाले आणि त्यांनी या संस्थेला मदत करण्यासाठी लिलावाचा आगळा फॉर्म्युला ठरवला.

'पॅडमॅन'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली!

दरम्यान, बहुचर्चित 'पद्मावत' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्यानंतर, 'पॅडमॅन'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधी 'पॅडमॅन'ही 25 जानेवारीलाच प्रदर्शित होणार होता, पण आता तो 9 फ्रेबुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांचा बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष टळलाय. संजय लीला भन्साळी यांच्या विनंतीवरून अक्षयने 'पॅडमॅन'चं प्रदर्शन पुढे ढकललंय. पद्मावतला सिनेमा लवकर प्रदर्शित करण्याची जास्त गरज आहे, हे ओळखून हा निर्णय घेतल्याचं अक्षयनं सांगितलं. 9 हा अक्षयचा 'लकी नंबर' असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्याच्या 'लकी' तारखेला प्रदर्शित होणारा पॅडमॅन बॉक्स ऑफिसवर कशी कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.   

टॅग्स :अक्षय कुमारपॅडमॅनबॉलिवूड