टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदकाची कमाई केली आणि इकडे सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नावाचे मीम्स व्हायरल झालेत. नीरजने गोल्ड जिंकताच अक्षयला आणखी एका बायोपिकचे स्वप्नं पडू लागले असावे, असा नेटक-यांचा रोख होता. मीम्ससोबत अक्षयचा एक जुना फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा फोटो अक्षयच्या ‘सौगंध’ या सिनेमातील होता. या फोटोत अक्षयच्या हातात एक काठी आहे. आता या मीमवर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.
नीरज चोप्रासोबत लोकांनी तुझाही संबंध जोडला. यावरचे अनेक मीम्स व्हायरल झालेत, यावर काय बोलशील, असा एक प्रश्न ताज्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आला. या प्रश्नावर अक्षय खळखळून हसला. हे मजेशीर आहे. मी तो फोटो पाहिला आहे. त्या फोटोत माझ्या हातात काठी आहे. माझ्या बायकोनंही मला हा फोटो पाठवला होता, असे अक्षय म्हणाला.
आपल्या बायोपिकमध्ये अक्षयने भूमिका साकारावी अशी इच्छा नीरज चोप्राने व्यक्त केली होती. याबद्दल विचारले असता, अक्षयला हसू आवरले नाही. माझ्या मते, मी नीरजच्या बायोपिकमध्ये काम करण्यापेक्षा त्यानेच माझ्या बायोपिकमध्ये काम करायला हवे. नीरज हँडसम आहे. माझे बायोपिक बनले तर त्याने लीड भूमिका साकारावी, असे अक्षय म्हणाला.नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अक्षयने त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या होत्या. ‘ सुवर्ण पदक जिंकून नीरज चोप्रा तू एक नवीन इतिहास रचला आहे... तुमचे खूप खूप अभिनंदन... तुझ्यामुळे भारतामधील कोट्यवधी लोकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले आहेत... वेल डन, असे ट्विट त्याने केले होते.