Join us

'सम्राट पृथ्वीराज'च्या अडचणी संपेना; ओमन, कुवेतमध्ये अक्षय कुमारचा चित्रपट बॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 10:30 AM

Samrat prithviraj: या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता या चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा नव्याने वाढ झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. इतकंच नाही तर या चित्रपटामुळे अनेक वादही निर्माण झाले. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला. ज्यामुळे या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं. मात्र, आता काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये हा चित्रपट बॅन केल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट ओमन आणि कुवेत येथे बॅन करण्यात आला आहे. सध्या याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरीदेखील या चित्रपटाला या दोन देशांनी बॅन केल्याचं सांगण्यात येतं. येत्या ३ जून रोजी म्हणजे बुधवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सम्राट पृथ्वीराज'संबंधित वाद

सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याला अनेक अडचणींना समोरं जावं लागलं. करणी सेनेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. जर या चित्रपटाचं नाव बदललं नाही तर हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असा इशारा करणी सेनेने दिला होता. त्यानंतर २७ मे रोजी या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर आता या चित्रपटाला ओमन व कुवेतमध्ये बॅन केल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून मानुषी छिल्लर कलाविश्वात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिने राजकुमारी संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. तसंच अक्षय आणि मानुषीसह या चित्रपटामध्ये संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव विज हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

टॅग्स :पृथ्‍वीराजअक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड