मुंबई : 'टॉयलेट- एक प्रेम कथा' आणि 'पॅडमॅन' या सारख्या चित्रपटांमधून समाजिक जागृतीचा संदेश देणारा अभिनेता अक्षय कुमार आता रस्त्यावर उतरला आहे. अक्षय कुमार आता रस्ते सुरक्षा अभियान करताना दिसून आला. दरम्यान, यासंदर्भात अक्षय कुमारने सोशल मीडियात काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये त्याने चक्क वाहतूक पोलिसाच्या गणवेशात इन्ट्री करत रस्त्यांवर लोकांना ट्रॅफिक नियमांचे धडे आणि 'सडक सुरक्षा-जीवन रक्षा'चा संदेश देत आहे.
गेल्या काही दिवासांपूर्वी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अक्षय कुमार यांनी 'सडक सुरक्षा-जीवन रक्षा' जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानासाठी अक्षय कुमारला ब्रँड अॅम्बेसेडर बनविण्यात आले आहे. या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी तीन लुघपट प्रदर्शित करण्यात आले. तिन्ही लघुपटांमध्ये अक्षय कुमारने वाहतूक पोलिसांची भूमिका साकारली आहे. तसेच, यामध्ये रस्त्यांवरील लोकांना ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लघंन करणा-यांना त्यांची चूक लक्षात आणून देत आहे.
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गोल्ड' लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमाबाबत बोलायचे झाले तर, १९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. हीच कथा ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गोल्ड’ सिनेमामध्ये अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधार बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे.
रिमा कागती दिग्दर्शित गोल्डमधून मौनी रॉय सिल्वर स्क्रिनवर पदार्पण करतेय. अक्षय कुमारसोबतच यामध्ये कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. अक्षयच्या या सिनेमाची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघता येते. बेबी, हॉलिडे, रुस्तम आणि 'एअरलिफ्ट' ह्या सारख्या चित्रपटातून अक्षय कुमारने आपल्यातील देशप्रेम जागे केले आहे आणि आता या चित्रपटातून ते अधिक उंचावले जाणार आहे.