Join us

Samrat Prithviraj: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव बदललं, करणी सेनेच्या विरोधानंतर निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 7:47 PM

Samrat Prithviraj: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव आता बदलण्यात आलं आहे.

Samrat Prithviraj: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. करणी सेनेनं केलेल्या मागणीनुसार आता चित्रपटाचं नाव 'सम्राट पृथ्वीराज' असं करण्यात आलं आहे. करणी सेनेनं चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवस शिल्लक असतानाच आता चित्रपटाच्या नावात बदल करुन वादावर पडदा टाकण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे. 

चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्री राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांना पत्र लिहून चित्रपटाच्या नावात अपेक्षित बदल करण्यात येत असल्याचं कळवलं असल्याचं वृत्त 'इंडिया टूडे'नं दिलं आहे. चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून आता 'पृथ्वीराज' चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज' या नावानं प्रदर्शित होणार आहे. श्री राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. तसेच याबाबत अनेक बैठका आणि नोटीशा मिळाल्यानंतर पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सनं राजपूत समाजाच्या भावाना आणि मागणीचा विचार करता चित्रपटाचं नाव त्यांनी पृ्थ्वीराज वरुन सम्राट पृथ्वीराज असा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशराज फिल्म्सनं निवेदनात काय म्हटलं?चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर करणी सेनेला एक पत्र लिहून याची माहिती दिली. "गेल्या ५० वर्षांपासून यशराज फिल्म्स भारतीय सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात यशराज फिल्म्सनं अनेक सर्वोत्तम सिनेमे दिले आहेत. सातत्यानं आम्ही रसिकांचं मनोरंजन करत आहोत आणि करत राहू. आमच्या सिनेमाच्या सध्याच्या नावासंबंधी तुमची जी तक्रार होती त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या शौर्याचं, कामगिरीचं आणि देशाच्या इतिहासात दिलेलं योगदान याचा आदर करतो. यासंदर्भात आपल्यामध्ये अनेकदा झालेल्या चर्चांनंतर शांततेत आम्ही तुमच्या तक्रारीचं निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचं नाव बदलून ते 'सम्राट पृथ्वीराज' असं करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचं आभार मानतो की, तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या", असं यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी करणी सेनेला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे

टॅग्स :अक्षय कुमारपृथ्वीराज चव्हाणमानुषी छिल्लर