Join us

अक्षया नाईकसोबत जुळणार अक्षय मुडावदकरची जोडी; 'स्वामी समर्थ'फेम अभिनेत्याचं नवं नाटक लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:38 IST

Natak: 'चूकभूल द्यावी घ्यावी' हे नाटक ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं 'चुकभूल द्यावी घ्यावी' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे.  या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जय जय स्वामी समर्थ फेम अभिनेता अक्षय मुडावदकर आणि अक्षया नाईक ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या नाटकातील अक्षयाचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. यामध्येच आता अक्षय तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अक्षयानंतर आता या नाटकातील अक्षयचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तसंच नाटकाचं नावही जाहीर करण्यात आलं. दिलीप प्रभावळकर यांचं  चूकभूल द्यावी घ्यावी हे नाटक ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या "चूकभूल द्यावी घ्यावी" या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. अतिशय हलकंफुलकं मनोरंजक असलेल्या नाटकाचं खूप कौतुक झालं. जुनं ते सोनं या म्हणीनुसार प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच मनोरंजक अनुभव नव्या रुपात देण्यासाठी या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. कसदार लेखनाला उत्तम अभिनयाची साथ असल्यानं हे नाटक रसिकांचं नक्कीच पुरेपूर मनोरंजन करेल यात शंका नाही.

नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी" नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन,नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.  

टॅग्स :नाटकअक्षया नाईकदिलीप प्रभावळकर