Join us

अक्षयचा 'रुस्तम' 'मोहेंजोदडो'वर पडला भारी, रुस्तमची 50 कोटींची कमाई

By admin | Updated: August 15, 2016 22:52 IST

अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची कमाई केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 -  अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, आशुतोष गोवारीकर यांच्या महत्त्वाकांक्षी मोहेंजोदडो या चित्रपटाबरोबर प्रदर्शित होऊनही रुस्तमने ही कामगिरी केली आहे. टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 14.11 कोटी, शनिवारी 16.43 कोटी आणि रविवारी 19.88 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट 100 कोटी क्‍लबमध्ये दाखल होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यापूर्वी हाऊसफुल 3 आणि एअरलिफ्ट या दोन चित्रपटांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक व्यवसाय केला होता.