Join us

'महिला अन् बालकांवरील अत्याचारात वाढ, हे चिंताजनक'; मनोज वाजपेयी स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 5:30 PM

देशातील महिला व बाल अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची वारंवार तक्रार होते. तर, विरोधकांकडूनही गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत सरकारला लक्ष्य केले जाते.

मुंबई - अभिनेता मनोज बाजपेयीचा एक बंदा काफी है हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वाद रंगला होता. या चित्रपटात आसाराम बापूच्या पात्राला दाखवण्यात आल्याचा आरोप करत आसाराम बापूच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज बाजपेयी आणि टीम सध्या मीडियासमोर येत आहेत. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. महिला व बाल लैंगिक अत्याचारावर हा चित्रपट भाष्य करतो. त्याअनुषंगाने अभिनेता मनोज बाजपेयींनी देशात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य केलंय. 

देशातील महिला व बाल अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची वारंवार तक्रार होते. तर, विरोधकांकडूनही गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत सरकारला लक्ष्य केले जाते. दोन दिवसापूर्वीच दिल्लीत एका १६ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीची निर्घून हत्या केली होती. त्यावरुन, देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. तर, दुसरीकडे खासदार ब्रीजभूषणसिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. त्यातच, मनोज वाजपेयी यानेही देशातील वाढत्या महिला अत्याचार व लैंगिक शोषणाच्या घटनांवर भाष्य केलंय. 

देशात महिला अत्यावर व लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. हे कुठंतरी थांबायला हवं. त्यासाठी आपण सर्वांनीच जनजागृती करायला हवी. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंदर्भात लोकांनी विचार करायला हवा. बालकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुटुंबाची असते. त्यासंदर्भात आता सर्वांनीच जागरुक व्हायला हवं, आणि समाजात याबाबत सर्वांनी जागरुकता करायला हवी, असेही मनोज बाजपेयी यांनी म्हटले. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी मनोज बाजपेयींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये, रावणाने रावण बनून सीतामातेचं अपहरण केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण, रावणाने साधू-संन्याशी बनून सीता मातेचं अपहरण केलं हे संतापजनक असल्याचं वाजपेयीने म्हटले होते. कारण, साधू-संन्याशी पंथांना बदनाम करण्याचं आणि समाजाचा विश्वासघात करण्याचं काम रावणाने केलं, असं मनोज बाजपेयी यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :मनोज वाजपेयीगुन्हेगारीमहिलामुंबई