>> प्रसाद लाड
एखादी सुंदर अभिनेत्री अनेकांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवते. एखादा अभिनेता अनेकांच्या गळ्यातील ताईत होतो. पण एखादी खट्याळ चेटकिण अनेकांच्या मनात घर करू शकते, अधिराज्य गाजवू शकते, हे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण रत्नाकर मतकरी लिखित अलबत्या-गलबत्या हे बालनाट्य आणि त्यामधली चेटकीण अजूनही चिरतरुण आहे. तिने सध्या मोबाईमध्ये रमणाऱ्या लहान मुलांनाही भूरळ पाडली आहे. त्यामुळेच 43 वर्षांपूर्वीचे हे बालनाट्य आत्ताच्या लहान मुलांनीही डोक्यावर घेतलं आहे. 15 ऑगस्टचे औचित्य साधून या नाटकाचे सलग पाच प्रयोग करण्यात येणार आहे. एकाच दिवसात एका बालनाट्याचे पाच प्रयोग आणि तेही हाऊसफुल्ल असणं, हा एक विक्रम ठरणार आहे. त्यामुळे या नाटकाने गिनीज बुकच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
" माझ्यासह बाल रंगभूमीसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे. बालनाट्याचे एवढे प्रयोग व्हावेत, ते डोक्यावर घ्यावं, ही एक मोठी गोष्ट आहे. अनेक भूमिकांसारखी एक भूमिका करायची, हे मी ठरवलं होतं. पण या भूमिकेला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळेल, असे मला वाटलं नव्हतं. कारण 43 वर्षांपूर्वी जी चेटकीण होती, त्यामध्ये आम्ही काही बदल केले आहेत आणि ते प्रेक्षकांच्या मनाला भावले आहेत," असं चेटकिणीची भूमिका करणारा वैभव मांगले सांगत होता.
या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आणि निलेश मयेकर यांना एक सकस बालनाट्य रंगभूमीवर आणावं, असं वाटत होतं. त्यावेळी लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरला एक बालनाट्य लिहायला सांगायचं आणि ते बसवून घ्यायचं, असं ठरलं. पण वेळ फारच कमी होता. त्यामध्ये नाटक लिहून रंगभूमीवर आणणं, सोपं नव्हतं. त्यावेळी मयेकर यांनी अलबत्या-गलबत्या हे नाटक करायचं का, असं सुचवलं. हा प्रस्ताव सर्वांनाच आवडला. त्यानंतर रत्नाकर मतकरी यांची भेट घेतली, त्यांनी नाटक करण्याची संमती दिली आणि काही दिवसांतच नाटक रंगभूमीवर आलं.
" अलबत्या-गलबत्या हे नाटक विक्रमांच्या पलीकडे गेलेलं आहे. नाटक घडण्याची आणि बनवण्याची एक प्रोसेस असते, ज्याचा मी एक भाग होतो. त्याचबरोबर नाटक चालवण्याची एक प्रोसेस असते. ज्याचा भाग निर्माते राहुल भंडारे, प्रस्तुतकर्ते निलेश मयेकर, सूत्रधार गोट्या सावंत आहेत. आम्ही जे 95 दिवसांत 100 प्रयोग करत आहोत, याचे श्रेय या तीन व्यक्तींसहीत नाटकांच्या कलाकारांना जातं. कारण हे नाटक करणं सोपं नाही. फार एनर्जी लागते. त्यामुळे एका दिवसात 3-4 प्रयोग करणं, सोपी गोष्ट नाही, " असं नाटकाचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर सांगत होता.
काही वर्षांपूर्वी चांगली बालनाट्य येत होती. पण गेल्या 10 वर्षांमध्ये फारशी सकस बालनाट्य आली नाही. आपल्या आई-बाबांनी चांगली बालनाट्य दाखवली, तर आपण आपल्या मुलांना बालनाट्य दाखवायला हवीत, ती करायला हवीत, असा विचार या नाटकाच्या टीमने केला आणि अलबत्या-गलबत्या हे रंगभूमीवर 43 वर्षांनी पुन्हा एकदा अवतरलं.
" या नाटकाचा प्रवास फारच सुखद होता. कारण पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते. हे श्रेय लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि ज्यापद्धतीने हे नाटक प्रस्तुत केलं गेलं, त्याचं आहे. पालक आपल्या मुलांना रात्री नाटकाला घेऊन येतील का, हा एक प्रश्न मनात होता. पण या नाटकाचे प्रयोग कोणत्याही वेळी लागले तरी ते हाऊसफुल्ल होत होते. आम्हाला या नाटकाच्या निमित्ताने चांगला प्रेक्षकवर्ग तयार करायचा होता. लहान मुलं मोबाईलमध्ये रमलेली असतात, त्यांना रंगभूमीपर्यंत खेचून आणण्याचा मानस सफल झाला आहे, असे आपण म्हणून शकतो," असे नाटकाचे निर्माते राहुल भंडारे सांगत होते.
अलबत्या-गलबत्या हे नाटक 95 दिवसांमध्ये शतक झळकावून थांबणारं नाही. ही खट्याळ चेटकिण इतक्यात प्रेक्षकांना सोडणार, असं वाटत नाही. त्यामुळे आता ही चेटकिण आणि नाटक किती मोठा पल्ला गाठतं, हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतील.
दिव्यांग मुलंही लुटणार नाटकाचा आनंद
दिव्यांग किंवा एचआयव्हीग्रस्त मुलांना या नाटकाचा आनंद लुटता यावा, यासाठी एक योजना आखण्यात आली आहे. 15 ऑगस्टला या नाटकाचा शंभरावा प्रयोग होत आहे. या गोष्टीचे औचित्य साधून जवळपास शंभर दिव्यांग किंवा एचआयव्हीग्रस्त मुलांना हे नाटक मोफत दाखवण्यात येणार आहे.