टायगर जिंदा है, सुल्तान, भारत यासारखे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित करणारा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar ) याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. होय, अली एका गोंडस चिमुकलीचा बाबा बनला आहे. अलीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.काल डॉटर्स डेच्या दिवशी अलीची पत्नी अलीसिया हिने कन्यारत्नाला जन्म दिला. अलीने पत्नीचा बेबी बम्प फ्लॉट करताना फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्याने लिहिलं, ‘अलीसिया आणि मी आपल्या प्रेमाचा प्रवास आनंदात सुरू झाला होता. ते पे्रम जे देश, रंग, जात यापलीकडे आहे. आम्ही नशीबवान आहोत की, आम्ही एकमेकांना भेटलो आणि लग्नबंधनात अडकलो. आता दोन वर्षांनंतर परमेश्वराने आम्हाला एक सुंदर भेट दिली आहे. 24 सप्टेंबरच्या रात्री 12.25 मिनिटाला एक छोटी परी आमच्या आयुष्यात आली. कृपा करून हिचं स्वागत करा. तिचं नाव अलीजा जहरा जफर आहे.’अली अब्बास जफरने ही गोड बातमी शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. सुनील ग्रोव्हरपासून प्रियंका चोप्रा, अनुष शर्मा, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, कतरिना कैफ, टिस्का चोप्रा, रकुलप्रीत सिंग, अर्जुन कपूर अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं.
अशी आहे अलीची लव्हस्टोरीअली अब्बास जफरने जानेवारी 2021 मध्ये अलीसियासोबत लग्न केलं. अलीसिया ही फ्रान्सची राहणारी आहे. दोघांनीही डेहराडून येथे लग्न केलं होतं. अली एका कामानिमित्त फ्रान्सला गेला होता. यादरम्यान अलीसियाशी त्याची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत अली अलीसियाच्या प्रेमात पडला होता. सलग दोन वर्ष अली अलीसियाला लग्नासाठी राजी करत होता. अखेर तिने होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं.
अलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो त्याच्या ‘जोगी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यात दिलजीत दोसांज लीड रोलमध्ये आहे. याशिवाय कतरिना कैफसोबतचा ‘सुपर सोल्जर’ हा सिनेमा अली दिग्दर्शित करणार आहे. अक्षय कुमार व टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा सिनेमाही तो दिग्दर्शित करतोय. याशिवाय शाहिदचा एक सिनेमाही तो दिग्दर्शित करणार आहे.