पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या रॅलीवर भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले. इम्रान खान यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पाकिस्तानी गायक, कलाकार अली जफर याचे ट्वीट चर्चेत आहे. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतरचे काळे दिवस आठवले असे त्याने ट्वीट मध्ये म्हटले आहे.
अली जफर प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आणि अभिनेता असून भारतातही त्याचे असंख्य चाहते आहेत. इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा त्यानेही निषेध दर्शवला आहे. अली जफर ट्वीट मध्ये म्हणतो,'मला शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरचे काळे, निराश दिवस आठवले. देवाच्या कृपेने इम्रान खान यांच्या बाबतीत काही गंभीर घडले नाही. कल्पनाही करता येत नाही पायाला तीन चार गोळ्या लागूनदेखील इम्रान खान यांचे स्पिरीट वाखणण्याजोगे आहे आहे. हे सर्व आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. ’ यासोबतच अली ने गोळीबारादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या घटनेवर भारतीय विदेश मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सर्व घटनांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.