Alia Bhatt Covid-19: बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन आता सतर्क झालं आहे. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या कलाकारांना महापालिका प्रशासनानं 'हायरिस्क कॉन्टॅक्ट' म्हणून घोषीत केलं असून सर्वांच्या कोरोना चाचणीसह राहतं घर देखील सॅनिटाइज केलं जात आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, करण जोहर यांच्यानंतर आता महापालिकेनं अभिनेत्री आलिया भट्ट राहत असलेल्या इमारतीचंही सॅनिटायझेशन केलं आहे.
मुंबई महापालिका प्रशासनानं पाली स्थितीत आलिया भट्टच्या वास्तू इमारतीत सॅनिटायजेशन केलं आहे. कारण करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत अभिनेत्री आलिया भट्ट देखील सहभागी झाली होती आणि तिच सर्वात प्राइम हायरिस्क कॉन्टॅक्ट असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे आलिया मात्र सर्वच इव्हेंटला उपस्थिती लावत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच आलियानं अभिनेता रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' या आगामी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलं. आता आलिया दिल्लीत एका इव्हेंटमध्ये व्यग्र आहे. दिलासादायक बाब अशी की आलियाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आलियासह करण जोहर आणि मलायका अरोरा यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री करिना कपूर, महीप कपूर, शनाया कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांचा कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. विशेष म्हणजे या सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेलं होतं. करिना कपूरसह वरील सर्व सेलिब्रिटी सध्या होम क्वारंटाइन आहेत.