अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात एकदम सेटल आहे. तिचे सिनेमे तर एकामागोमाग एक चालतच आहेत. तसंच संसारातही ती रमली आहे. नवरा रणबीर आणि लेक राहासोबत ती सुखी आयुष्य जगत आहे. पण तिला 'एडीएचडी' हा आजार असल्याचं तिने सांगितलं होतं. तर आता नुकतंच तिने आणखी एक खुलासा केला आहे. आलियाला मूड ऑफ असल्यावर दुसऱ्यांच्या घरात डोकवायची सवय असल्याचं ती म्हणाली.
जय शेट्टीला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट म्हणाली, "बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा माझा दिवस चांगला जात नसतो तेव्हा मी आमच्या छोट्या बाल्कनीत जाते. फायर एक्झिट असतं तेवढी ती छोटी बाल्कनी आहे. मी तिथे जाऊन उभी राहते. तिथून बाजूच्या घराची बाल्कनी अगदीच जवळ आहे. त्यामुळे माझं लक्ष त्यांच्या घरात जातं. मी बघत राहते की त्यांच्याकडे नक्की काय चाललंय. कोणी हातात कपडे घेऊन इकडून इकडून तिकडे फिरतं. कोणी टीव्ही पाहत असतं. मी फक्त दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये डोकवत नाही. पण असं केल्याने मला इतरांच्या आयुष्याची, त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव होते."
ती पुढे म्हणाली, "अनेकदा आपण स्वत:बद्दलच विचार करतो. पण आपण जर थोडं मागे गेलो तर आपल्याला गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने दिसतात. काही क्षणात तुम्हाला जाणीव होते की आयुष्यात तुम्ही कोणत्या स्टेजवर पोहोचला आहात. मग तुम्हालाच तुमचा अभिमान वाटतो. हे किती चांगलं आहे."